श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची अमृतवचने !

श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

१. बोलतांना वाणीही शिष्यभावात म्हणजे नम्र असण्याचे महत्त्व !

१ अ. आपल्या वाणीमुळेच दुसर्‍याची वाणी आपल्याला ‘तथास्तु’ म्हणत असल्यामुळे बोलतांना अतिशय सांभाळून बोलावे ! : ‘आपल्या प्रत्येक कृतीत शिष्यभाव असायला हवा. इतरांशी बोलतांना आपली वाणीही शिष्यभावात असायला हवी, म्हणजेच नम्र असायला हवी. आपल्या वाणीमुळेच दुसर्‍याची वाणी आपल्याला ‘तथास्तु’ म्हणत असते. त्यामुळे बोलतांना अतिशय सांभाळून बोलावे. कुणालाही वावगे बोलू नये. तोंडातून अपशब्द काढू नयेत.

१ आ. शब्द म्हणजे ‘नादशक्ती’ असल्यामुळे आणि ‘नाद’ हा आकाशतत्त्वाशी संबंधित असल्याने बोलण्याचा परिणाम स्वतःसमवेतच सभोवतालच्या वातावरणावरही होत असणे; म्हणून बोलतांना विचार करून बोलावे ! : वाणीमध्ये ‘नादशक्ती’ असल्याने आणि ‘नाद’ हा आकाशतत्त्वाशी संबंधित असल्याने आपल्या बोलण्याचा सूक्ष्म परिणाम हा जसा आपल्यावर होत असतो, तसा सभोवतालच्या वातावरणावरही होत असतो. एकदा बोललेला शब्द पुन्हा मागे घेता येत नाही; त्यामुळे बोलतांना विचार करून सुबुद्धीचा वापर करून मगच बोलावे.

२. चराचरातील गुरुतत्त्व पहाता आल्याने सतत शिष्यभावात रहाता येऊन चिरंतन आनंदाकडे वाटचाल करता येणे, म्हणजेच ‘गुरुकृपा’ होणे !

‘सतत इतरांकडून शिकणे, म्हणजे अखंड ‘शिष्यभावात’ रहाणे. यामुळे चराचरात प्रत्येक ठिकाणी गुरुतत्त्वाला पहाणे शक्य होते. शिष्यभाव साधकाला श्री गुरूंच्या देहापलीकडे असलेल्या चैतन्याची जाणीव करून देतो. प्रत्येकालाच ‘गुरु’ या भावाने पाहिल्याने साधकाला कुणाविषयी प्रतिक्रिया येत नाहीत. त्यामुळे त्याच्या अपेक्षा संपतात आणि आपोआपच त्याचे मायेत अडकणेही संपते. मायाच संपुष्टात आल्याने साधकाला चिरंतन अशा शाश्‍वत आनंदाच्या दिशेने वाटचाल करणे शक्य होते. यालाच ‘गुरुकृपा होणे’, असे म्हणतात.

३. दुःख कुणीही पचवू शकणे; मात्र कौतुक पचवता न येणे आणि ते केवळ गुरुकृपेनेच शक्य होणे !

कष्ट सहन करून दु:खाला सामोरे जाता येऊ शकते; पण जेव्हा आपले कौतुक होते, तेव्हा मात्र जिवाचे कर्तेपण वाढून ‘अहं’ जोपासला जाऊ शकतो. हा ‘अहं’ आपल्याला पुन्हा अधोगतीकडे नेण्यास कारण ठरतो. श्री गुरु साधकाला याची वेळोवेळी जाणीवही करून देतात आणि साधकाला ‘अहं’चा बळी होण्यापासून वाचवतात. दुःख असो वा कौतुक या दोन्ही गोष्टी मायेतील मृगजळासमानच आहेत. श्री गुरूंच्या मार्गदर्शनामुळे ‘हे कौतुक माझे नसून माझ्याकडून योग्य कर्म करवून घेणार्‍या माझ्या श्री गुरूंचे आहे’, याची जाणीव झाल्यावर कौतुकाचेही काही वाटत नाही. उलट श्री गुरूंप्रती कृतज्ञताभाव जागृत होतो. कौतुकाचे शब्द श्री गुरूंच्या चरणांशीच अर्पण केल्याने जीव कौतुकापासून बाजूला होऊ शकतो. ‘सर्वकाही देवाचे आहे. त्याचे त्यालाच अर्पण’, हा भाव मनात निर्माण झाल्याने तो जीव खर्‍या अर्थाने आसक्तीविरहीत होतो आणि कौतुकातील ईश्‍वरी तत्त्वाची अनुभूती घेण्यास पात्र ठरतो.’

-श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ (४.४.२०२०)