ब्रिगेडियर अनंत नाईक आत्महत्या प्रकरणी लष्कारातील ४ वरिष्ठ अधिकार्‍यांवर गुन्हा नोंद !

पुणे – वानवडी येथील लष्करी वैद्यकीय महाविद्यालय (ए.एफ्.एम्.सी.) येथे व्यवस्थापनात सेवारत असलेले ब्रिगेडियर अनंत नाईक यांनी रेल्वे स्थानकात उद्यान एक्सप्रेस समोर उडी घेत आत्महत्या केली. त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी लष्करातील ४ वरिष्ठ अधिकार्‍यांवर पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे, अशी माहिती पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंह गौड यांनी दिली. या प्रकरणी त्यांचा मुलगा अभिषेक नाईक यांनी तक्रार दिली आहे.


अनंत नाईक यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिट्ठीत संबंधित ४ अधिकार्‍यांनी मला त्रास दिला, विनाकारण खोटे आरोप लावले असे लिहून ठेवल्याने याचा आधार घेत मेजर बलप्रीत कौर, मेजर नीलेश पटेल, लेफ्टनंट कर्नल कुशाग्रा आणि ब्रिगेडियर एस्.के. श्रीवास्तव यांच्यावरती गुन्हा नोंद केला आहे. लोहमार्ग पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास केला होता. त्या वेळी अनंत नाईक यांच्या घरी सुसाईड नोट मिळाली होती.