अत्यावश्यक सेवेत समावेश करण्याच्या मागणीसाठी माथाडी कामगारांचे कामबंद आंदोलन

नवी मुंबई, २४ एप्रिल (वार्ता.) – राज्यशासनाने माथाडी कामगारांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करून त्यांना कामावर येण्यासाठी रेल्वे आणि बसने प्रवास करण्याची अनुमती द्यावी, या मागणीसाठी २४ एप्रिलला राज्यातील सहस्रो माथाडी कामगारांनी एक दिवसाचा लाक्षणिक संप केला. महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने या संपाचे नेतृत्व केले. या संपामध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीसह नाशिक, पुणे, लातूर आणि कोल्हापूर येथील बाजार समित्यांमधील माथाडी कामगार सहभागी झाले होते. त्यामुळे या बाजारपेठांतील सर्व व्यवहार ठप्प होते.

या संघटनेचे सरचिटणीस आणि माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी सांगितले की,  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विनंतीला मान देऊन नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होऊ नये; म्हणून माथाडी कामगार जीव मुठीत घेऊन काम करत आहेत. या कामगारांकडे स्वतःची गाडी नाही किंवा अव्वाच्या सव्वा पैसे व्यय करून खाजगी गाडीने प्रवास करण्याची क्षमता नाही. असे असतांनाही या कामगारांना कामाच्या ठिकाणी ये-जा करण्यास रेल्वे, सार्वजनिक बससेवा याने प्रवास करण्यास राज्य सरकारने अनुमती नाकारली आहे. परिणामी या कामगारांना कामावर येण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या कामगारांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करून त्यांना कामाच्या ठिकाणी ये-जा करण्यास रेल्वे, बससेवा यांनी प्रवास करण्यास अनुमती द्यावी. यासाठी हा लाक्षणिक संप करण्यात आला होता, याला सर्व व्यापारी संघटनांनीही पाठिंबा देऊन सर्व बाजारपेठा बंद ठेवल्या होत्या, अशी माहिती नरेंद्र पाटील यांनी दिली.