‘ऑनलाईन’ शिक्षणाने लिखाणाचाच विसर !

असे म्हणतात की, हस्ताक्षरावरून मनुष्याचा स्वभाव कळतो. पूर्वी शाळेच्या वहीत किंवा परीक्षेत काढलेले सुंदर हस्ताक्षर पाहून शिक्षकांना झालेला आनंद आणि त्यातून लाभलेले समाधान हा क्षण विलक्षण असायचा. लहानपणापासूनच हस्ताक्षर सुधारण्यासाठी शिक्षक विशेष प्रयत्न करवून घेत; मात्र सध्या ‘ऑनलाईन’ शिक्षण देण्यात येत असल्याने मुलांचे लिखाण करण्याचे प्रमाण न्यून झाले आहे. ‘ऑनलाईन’ शिक्षणपद्धतीमुळे भ्रमणभाषवर फिरणार्‍या बोटांना पेन आणि वही यांचा विसर पडत आहे. त्यामुळे त्यांचा वापर करण्याचे प्रमाणही अल्प झाले आहे. या कालावधीत बहुतांश विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षराची लय आणि गती हरवत चालली असून ही चिंता आता पालकांनाही त्रस्त करत आहे. ‘ऑनलाईन’ शिक्षणाचा असाही एक गंभीर दुष्परिणाम मुलांवर होत आहे.

प्रतीकात्मक छायाचित्र

मुलांचे हस्ताक्षर सुधारणे, लेखन सरावात नियमितता आणणे, लिखाणाची गती वाढवणे या गोष्टी प्राथमिक असल्या, तरी मुलांच्या भविष्यासाठी त्या आवश्यक आहेत. विशेष करून दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी लेखन सराव अन् गती आवश्यक असते. समर्थ रामदासस्वामी यांनी ३५० वर्षांपूर्वी दासबोधातून हस्ताक्षर सुंदर कसे करावे, याविषयी मार्गदर्शन केले असून ते आताही मोलाचे ठरते. यावरून समर्थांची दूरदृष्टी आपल्या लक्षात येते. समर्थ रामदासस्वामी यांचा ‘घडसुनी’ हा शब्द महत्त्वाचा आहे. अक्षर सुंदर करायचे असल्यास ते घोटून सुंदर करायला हवे. ‘सुंदर हस्ताक्षर ही दैवी देणगी आहे’, असे सर्वांना वाटते. प्रतिदिन योग्य पद्धतीने सराव केल्यास हस्ताक्षर सुधारते. लिखाणाचा सराव केल्याने मराठी व्याकरणाचाही सराव होतो. एकदा लिहिणे म्हणजे दोन वेळा वाचन केल्यासारखे आहे. त्यामुळे प्रश्‍नोत्तरे लिहिल्यास ते लवकर लक्षात रहाण्यास साहाय्य होते.

सध्या दैनंदिन जीवनात संगणकाचा वापर वाढला असला, तरी लिखाण सुंदर, शुद्ध आणि त्याची योग्य गती असणेही तितकेच आवश्यक आहे. सध्या शाळा बंद असल्याने याचे मुख्य दायित्व मुलांच्या पालकांवरच आहे. त्यामुळे त्यांनीच याकडे डोळ्यात तेल घालून मुलांची लिखाणाची गती वाढावी, तसेच हस्ताक्षर सुधारण्यासाठी प्रतिदिन शुद्धलेखन लिहिण्यास सांगून, त्यांच्याकडून ते करवून घ्यावे लागेल.

– वर्षा कुलकर्णी, सोलापूर