मृत रुग्णाच्या कोरोना चाचणीचा अहवाल तीनदा पालटल्यामुळे नातेवाईक त्रस्त !

  • अंत्यसंस्काराच्या वेळी मृत व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे समजल्यावर जमलेले पसार

  • याला उत्तरदायी असणार्‍यांवर कठोर कारवाई करा !

कर्नाटक आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार !

यादगिरी (कर्नाटक) – कोरोना चाचणी नकारात्मक असलेल्या मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्काराच्या वेळी त्या व्यक्तीचा अहवाल सकारात्मक असल्याचे कळल्यावर  आरोग्य विभागातील कर्मचारी भयभीत झाले. मृत व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे समजल्यावर तिच्या अंत्यसंस्कारासाठी जमलेले सर्व पसार झाल्याची घटना येथील शहापूर गावात घडली. त्यानंतर पुन्हा एकदा अहवाल नकारात्मक असल्याचे सांगितल्यावर गोंधळाचे वातारवण निर्माण झाले.

रस्तापूर गावातील ७५ वर्षांच्या एका व्यक्तीला तिची प्रकृती बरी नसल्याने गावाच्या एका खासगी चिकित्सालयात १८ एप्रिल या दिवशी भरती करण्यात आले. त्याच दिवशी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्या वेळी रुग्णाचा अहवाल नकारात्मक आल्याने आधुनिक वैद्यांनी त्यांच्यावर उपचार केले. उपचारांच्या वेळी व्यक्तीचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीचा कोरोनाचा चाचणीचा अहवाल नकारात्मक असल्याने त्या व्यक्तीचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाइकांना देण्यात आला. २० एप्रिल या दिवशी अंत्यसंस्कार करण्यात येणार असतांना आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांनी धावत येऊन मृत व्यक्तीचा अहवाल सकारात्मक असून मृत रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे सांगितले. हे ऐकताच अंत्यसंस्कारासाठी जमलेल्यांनी घाबरून तेथून काढता पाय घेतला. नंतर कोरोना नियमांचे पालन करत कुटुंबातील चौघांनी मिळून अंत्यसंस्कार पार पाडला. अंत्यसंस्कार संपल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी आरोग्य अधिकार्‍यांनी येऊन मृत व्यक्तीचा अहवाल नकारात्मक आल्याचे सांगितले. मृताच्या कुटुंबियांना यातील कोणता अहवाल खरा मानायचा हे न समजल्याने ते त्रस्त झाले.

आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीच्या घशातील आणि नाकातील द्रव एकदाच संग्रहित करून परीक्षणासाठी पाठवला असूनही अहवाल मात्र ३ (पहिला नकारात्मक, दुसरा सकारात्मक आणि तिसरा पुन्हा नकारात्मक) आले आहेत. यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.