कोल्हापुरात ‘रेमडेसिविर इंजेक्शन’चा काळाबाजार करणार्‍या दोघांना अटक !

कोल्हापूर, २० एप्रिल – शहरात ‘रेमडेसिविर इंजेक्शन’चा काळाबाजार करणारे योगीराज वाघमारे (वय २४ वर्षे, शाहूपुरी) आणि पराग पाटील (वय २६ वर्षे, कसबा बावडा) यांना २० एप्रिल या दिवशी अटक केली आहे. या दोघांकडून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ११ ‘रेमडेसिविर इंजेक्शने’ जप्त केली आहेत. ते १८ सहस्र रुपये इतक्या दराने या इंजेक्शनची विक्री करत होते. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या ७ सहस्रांपेक्षा अधिक ‘रेमडेसिविर इंजेक्शन’ची आवश्यकता असून जिल्ह्यात अत्यंत अल्प साठा उपलब्ध आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणार्‍यांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यावर प्राथमिक टप्प्यात ‘रेमडेसिविर इंजेक्शन’ रुग्णांना उपयोगी पडते. त्यामुळे याची अत्यावश्यकता अधिक आहे. याचा काळाबाजार होत असल्याचे समोर आल्याने आरोग्ययंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.