कोरोनाच्या संक्रमणासाठी राजकीय नेतेही काही प्रमाणात दोषी !

सोनिया गांधी यांनी वक्तव्य केल्याचा राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा दावा !

कोरोनाच्या संक्रमणासाठी राजकीय नेतेच उत्तरदायी आहेत; कारण गेल्या ७४ वर्षांत जनतेला शिस्त न शिकवल्यामुळे जनतेमध्ये कोरोनाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. राजकीय नेते निवडणुकीच्या प्रचारासाठी सहस्रोंच्या संख्येने आलेल्या लोकांसमोर भाषण देत आहेत. राजकीय नेत्यांनी जनतेला साधना न शिकवल्यामुळे या आपत्काळावर मात करण्यात ती अपयशी ठरत आहे !

जयपूर (राजस्थान) – सोनिया गांधी योग्यच म्हणतात, ‘कोरोना संक्रमणाच्या प्रसारासाठी आम्ही राजकीय नेतेही काही प्रमाणात दोषी आहोत.’ आता कोरोना नव्या रूपात प्रकट झाला आहे आणि देशात भयावह स्थिती निर्माण होत चालली आहे. इतकेच नाही, तर संचारबंदी आणि दळणवळण बंदी यांसारखे निर्णय घ्यावे लागत आहेत. पंतप्रधानांनी पूर्वीप्रमाणेच राज्यांसमवेत चर्चा करायला हवी, असे ट्वीट राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केले आहे.