गरजू रुग्णांनाच मिळेल इंजेक्शन
रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार झाल्यानंतर असा निर्णय घेणारे कचखाऊ प्रशासन !
संभाजीनगर – राज्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असतांना या उपचारांत वापरल्या जाणार्या रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार होत आहे. गरजू रुग्णांना माफक दरात हे इंजेक्शन मिळावे यासाठी ते आता केवळ रुग्णालयांनाच देण्यात येणार आहे. औषध दुकानांत रेमडेसिविर इंजेक्शनच्या विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. काळाबाजार रोखण्यासाठी स्थानिक जिल्हाधिकार्यांवर या इंजेक्शनच्या वितरणाचे दायित्व सोपवण्यात आले आहे.
(रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार होण्यापूर्वीच जिल्हाधिकार्यांना या इंजेक्शनचे वितरण करण्याचे दायित्व दिले असते, तर अनेक रुग्णांचे पैसे आणि मानसिक त्रास वाचला असता. प्रशासनाच्या कचखाऊ धोरणामुळे त्याचा फटका रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना बसत आहे. – संपादक)
असा थांबेल इंजेक्शनचा काळाबाजार…
१. जे रुग्ण अतीगंभीर असतील, त्यांना प्राधान्यक्रमाने रेमडेसिविर इंजेक्शन देण्यात येणार आहे.
२. यासाठी रुग्णालये रुग्णांची माहिती सकाळी ९ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाला ई-मेलद्वारे कळवतील.
३. रुग्णांच्या माहितीच्या ई-मेलमध्ये रुग्णालयाच्या अधिकार्यांचा दूरभाष क्रमांक आणि ई-मेल असणे आवश्यक आहे.
४. गंभीर रुग्णांची सूची मिळाल्यानंतर निवासी वैद्यकीय अधिकारी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शिफारशीनुसार उपलब्ध इंजेक्शनचा ठराविक प्रमाणात कोटा संमत करतील.
५. नंतर रुग्णालयाला वितरक निश्चित करून देण्यात येईल. त्यांच्याकडून संबंधित रुग्णालयाने कोटा उपलब्ध करून घ्यावा.
६. ज्या रुग्णांसाठी इंजेक्शन वापरले जाणार आहे, त्या रुग्णांची नावे आणि संबंधित औषधांवर मार्करने वितरकाचे नाव लिहावे.
७. इंजेक्शनच्या रिकाम्या बाटल्या जतन कराव्यात. त्या भरारी पथकाला उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे.
८. गंभीर रुग्णाची माहिती विहित नमुन्यात भरली नाही आणि त्याला इंजेक्शन मिळाले नाही, तर हे दायित्व संबंधितांचे असेल.
रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा रुग्णालयांनाच, औषध दुकानांत बंदी ! – राजेंद्र शिंगणे, मंत्री, अन्न आणि औषध प्रशासन
रेमडेसिविर इंजेक्शन वापराची आचारसंहिता पाळली जात नाही. परिणामी तुटवडा झाला. यासाठी कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणार्या रुग्णालयांनाच रेमडेसिविर इंजेक्शन पुरवण्यात येत असून औषध दुकानांत ते विकता येणार नाही. त्यामुळे याचा काळाबाजार संपुष्टात येत असल्याचा दावा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केला. जिल्हाधिकार्यांना पत्र पाठवून वाटपाचे नियंत्रण करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. ४ दिवसांत तुटवडा संपेल, असे सांगून निर्यातसाठा विक्रीस अनुमती देण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.