संभाजीनगर – राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गामुळे राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार शहरातही ठिकठिकाणी रस्त्यावर पोलीस उभे आहेत. रस्त्यांवर विनाकारण फिरणार्यांना पोलीस अडवत आहेत. अशातच शहरातील महात्मा फुले चौक येथे स्वतःच्या नातेवाइकाला अडवल्याच्या कारणावरून जिल्ह्यातील गंगापूर येथील भाजपचे आमदार प्रशांत बंब आणि पोलीस यांच्यात वादावादी झाली.
आमदार बंब यांचा तरुण नातेवाईक जात असतांना त्याला पोलिसांनी अडवले. या वेळी त्याने ‘‘कोविड सेंटर’मध्ये रुग्णाला चहा-बिस्किट देेण्यासाठी जात आहे’, असे सांगितले. या वेळी ‘कोविड सेंटर’मध्ये नातेवाइकांना जाऊ दिले जात नसल्याने पोलिसांना शंका आली. त्यांनी त्याच्यावर १८८ नुसार कारवाई करून सोडून दिले; मात्र तरीही तो गेला नाही. त्याने आमदार प्रशांत बंब यांना बोलावून घेतले.
यानंतर प्रशांत बंब यांनी पोलिसांशी याविषयी विचारणा केली. ‘त्याला का अडवले ? तो कोरोना रुग्णांचा नातेवाईक आहे. तो रुग्णालयात गेला असल्याचे ते पोलिसांना सांगू लागले. ‘तुम्ही अशा लोकांना अडवू शकत नाही’, असेही ते म्हणाले; मात्र पोलिसांनी त्याच्यावर शंका आल्यामुळे कारवाई केली असल्याचे सांगितले. यानंतर बंब यांनी पोलिसांशी वादावादी केली. या वेळी पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, पोलीस अंमलदार योगेश नाईक, ज्योती कीर्ती शाही, वाहतूक शाखेचे कैलास पुसे, रमेश वाघ हे या ठिकाणी होते.