विरार-वसई येथील रुग्णालयामध्ये ऑक्सिजनचे ४ सिलेंडरच मिळाले

  • विरार-वसई येथील विदारकता !

  • प्रत्यक्षात १०० सिलेंडरची आवश्यकता

  • तुटवड्याअभावी गाडीतील ऑक्सिजनच्या सिलेंडरची चोरी

‘भीषण आपत्काळ अगदी समीप आला आहे’, हेच या सर्व घटना दर्शवतात !

प्रतीकात्मक छायाचित्र

विरार-वसई – येथील भागात ऑक्सिजनची पुष्कळ कमतरता आहे. त्यामुळे रुग्णांना एका रुग्णालयातून दुसर्‍या रुग्णालयात हालवण्यात येत आहे. आधुनिक वैद्यांनी तहसीलदारांना सांगितल्यावर केवळ २ घंट्यांसाठी ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यात आला.

१. गोल्डन पार्क रुग्णालयातील आधुनिक वैद्य पेस्तनजी यांना पोलिसांना पत्राद्वारे कळवले की, ऑक्सिजनअभावी रुग्णालयात रुग्णांचा मृत्यू झाल्यास आम्हाला संरक्षण द्यावे. त्यांनी पालिकेककडे मागणी केल्यावर त्यांना १० सिलेंडरचे आश्‍वासन देण्यात आले; मात्र प्रत्यक्षात ४ सिलेंडरच मिळाले. २०० रुपयांऐवजी ८०० रुपयांना हे सिलेंडर देण्यात आले. (आपत्काळात रुग्णांचा विचार न करता सिलेंडरची चढ्या दराने विक्री करणार्‍या संबंधितांकडून अधिकचे पैसे वसूल करून घ्यायला हवेत ! – संपादक)

२. खरेतर दिवसाला या रुग्णालयामध्ये १०० सिलेंडरची आवश्यकता आहे. ५० खाटांच्या रुग्णालयात ७४ रुग्ण भरती आहेत. प्रतिदिन २० ते २२ रुग्णांना ऑक्सिजनअभावी परत पाठवले जाते. भोजनकक्ष, कॉन्फरन्स सभागृह येथेही आता रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे.

३. अन्य आधुनिक वैद्यांच्या गाडीतील ऑक्सिजनचा सिलेंडर चोरण्यासारखे गंभीर प्रकारही येथे घडत आहेत.