कु. शिवलीला गुब्याड यांना स्वरक्षण प्रशिक्षण सेवा करतांना आलेल्या अनुभूती

१. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी सोलापूर सेवाकेंद्रात चालू केलेल्या वर्गानंतर स्वरक्षण प्रशिक्षण उपक्रमातील अडथळे दूर होऊन सेवेतील सहभाग आणि गती वाढणे

‘दळणवळण बंदीपूर्वी माझी स्वरक्षण प्रशिक्षणाची सेवा पूर्ण थांबली होती. या कालावधीत मी सोलापूर सेवाकेंद्रात असतांना एक दिवस सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी सांगितले, ‘‘येथील सर्व साधकांसाठी प्रशिक्षण वर्ग ठेवूया.’’ सद्गुरु स्वातीताई स्वतः या वर्गात सहभागी झाल्या. त्या वेळी प्रकार घेण्यासाठी मी समोर उभी होते. श्री दुर्गादेवीस्वरूप असणार्‍या सद्गुरु स्वातीताई प्रशिक्षणाचे प्रकार करतांना ‘त्यांच्याकडून चैतन्य मिळत आहे’, असे मला जाणवले. हा वर्ग चालू झाल्यानंतर काही दिवसांतच प्रशिक्षण उपक्रमातील अडथळे दूर होऊन माझा सेवेतील सहभाग वाढून गतीही वाढत गेली.

कु. शिवलीला गुब्याड

२. शौर्यजागृती व्याख्यानाच्या आयोजनाच्या कालावधीत अनुभवलेली श्री भवानीदेवीची कृपा !

२ अ. व्याख्यानाच्या माध्यमातून ‘श्री भवानीदेवीची शक्ती संपूर्ण महाराष्ट्रात प्रक्षेपित होत आहे’, असा भावप्रयोग घेतल्यावर ‘इंटरनेट’ची अडचण दूर होऊन बोलणे सर्वांपर्यंत पोचणे : सोलापूर येथील महिला शौर्यजागृती व्याख्यानाच्या आदल्या दिवशी आम्ही सर्व प्रशिक्षक नियोजन करण्यासाठी एकत्र जमलो होतो. त्या वेळी सर्वांनाच ‘इंटरनेट’ची पुष्कळ अडचण येत होती. काही जणांचा आवाजही येत नव्हता. तेव्हा ‘श्री भवानीदेवीची शक्ती शौर्यजागृती व्याख्यानाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात प्रक्षेपित होत आहे’, अशा आशयाचा भावप्रयोग घेतला. त्या वेळी वातावरणात शांतता पसरली आणि माझा आवाज ‘इंटरनेट’च्या अडथळ्याविना सर्वांपर्यंत पोचला. या वेळी ‘श्री भवानीदेवीने तिच्या कृपेची साक्षच दिली’, असे मला वाटले.

२ आ. श्री भवानीदेवीचे सतत स्मरण होऊन तिचे अस्तित्व जाणवणे : व्याख्यानाच्या आयोजनाच्या कालावधीत ‘श्री भवानीदेवी सतत माझ्या समवेत असून ती मला सेवेविषयी विविध सूत्रे सुचवत आहे’, असे जाणवत होते. या कालावधीत मला दिवसभर श्री भवानीदेवीचे स्मरण होत होते. मला एकदा रात्री स्वप्नातही श्री भवानीदेवीचे दर्शन झाले.

३. कु. दीपाली मतकर यांच्या मार्गदर्शनाचा झालेला लाभ !

३ अ. कु. दीपाली मतकर यांनी स्वप्नात येऊन प्रशिक्षणाचे प्रात्यक्षिक पहाण्याची इच्छा व्यक्त केल्यावर ‘प्रशिक्षणाचा आणखी सराव करायला हवा’, हेे लक्षात येणे : एकदा माझ्या मनात विचार येत होते, ‘माझे प्रशिक्षणाचे प्रकार व्यवस्थित होत आहेत कि नाहीत ?’ त्या दिवशी रात्री माझ्या स्वप्नात दीपालीताई (कु. दीपाली मतकर) आली आणि म्हणाली, ‘मला तुझे स्वरक्षण प्रशिक्षणाचे प्रात्यक्षिक पहायचे आहे.’ त्यानंतर ‘मी आणखी सराव करणे अपेक्षित आहे’, हे लक्षात येऊन सराव करण्यावर मन केंद्रित केले.

३ आ. कु. दीपालीताईने अर्जुनभाव ठेवून भाव वाढवण्यास सांगितल्यावर मन स्थिर होणे : एकदा मला काही विचारांमुळे अस्थिर आणि भीतीदायक वाटत होते. त्या दिवशी आमच्या व्यष्टी साधनेच्या आढाव्यात कु. दीपाली मतकर यांनी आम्हाला मार्गदर्शन केले. त्या वेळी दीपालीताईने आम्हाला अर्जुनभाव ठेवून भाव वाढवण्यास सांगितले. दीपालीताईने सांगितल्यानुसार प्रयत्न केल्याने माझे मन स्थिर झाले. या वेळी ‘देवाने दीपालीताईच्या रूपात साहाय्य केले’, याची मला जाणीव होऊन कृतज्ञता वाटली.

४. प्रशिक्षण वर्ग चालू असतांना वीजप्रवाह खंडित झाल्यावर देेवाला प्रार्थना केल्यानंतर तो पुन्हा सुरळीत चालू होणे

एक दिवस स्वरक्षण प्रशिक्षण वर्ग चालू असतांना वीजप्रवाह खंडित झाल्यावर ‘वर्ग होईल कि नाही’, असे मला वाटत होते. तेव्हा पावसाचे वातावरणही होते. त्या वेळी मी देेवाला प्रार्थना केल्यानंतर काही वेळातच वीजप्रवाह पुन्हा सुरळीत चालू झाला आणि वर्ग निर्विघ्नपणे होऊ शकला.’

– कु. शिवलीला गुब्याड, सोलापूर (१२.१०.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक