सनातनच्या संतांनी वापरलेले कपडे जतन, संशोधन आणि आध्यात्मिक लाभ होणे यांसाठी उपयोगात आणले जातात. (सनातन संस्थेचे संत आणि सद्गुरु यांंनी वापरलेले कपडे चैतन्यमय झालेले असल्याने ते आध्यात्मिक त्रास असणार्या साधकांना आध्यात्मिक लाभ होण्यासाठी, तसेच आध्यात्मिक संशोधन करण्यासाठी जतन केले जातात. – संकलक) सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांचे कपडे पहातांना देवद आश्रमातील साधिकांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. कु. सोनाली गायकवाड
१ अ. सद्गुरु अनुताईंच्या कपड्यांमध्ये सजीवता जाणवून त्यांची प्रीती कपड्यांमध्येही उतरल्याचे जाणवणे : सद्गुरु अनुताईंच्या कपड्यांना स्पर्श केल्यावर त्या स्पर्शातून ‘कपडे अनेक गोष्टी शिकवत आहेत आणि सांगत आहेत’, असे मला जाणवले. ‘ते कपडे जणू सजीवच आहेत’, असे मला जाणवत होते. ही सेवा करतांना मला उत्साह वाटत होता. त्या कपड्यांचा स्पर्श प्रीतीमय आणि आल्हाददायी होता. ‘सद्गुरु अनुताईंमधील प्रीती त्या कपड्यांमध्येही उतरली आहे’, असे मला जाणवले. ‘आपणही या कपड्यांवर प्रेम करावे’, असे मला वाटले.
१ आ. ‘सद्गुरु अनुताईंचे कपडे पुष्कळ आनंदी आणि समाधानी झाले आहेत’, असे मनात येणे : ‘सद्गुरूंची सेवा करून ते कपडे पुष्कळ आनंदी आणि समाधानी झाले आहेत. आता आपण सद्गुरु ताईंच्या सेवेत नसणार’, याविषयी त्यांना वाईट वाटत नाही’, असे मला वाटले. ते कपडे सद्गुरु ताईंशी जणू एकरूप झाले असल्याने त्यांच्यात कुठे वेगळेपणा जाणवत नव्हता.
१ इ. सद्गुरु अनुताईंमध्ये असलेल्या भावाचा कपड्यांवर झालेला परिणाम
१ इ १. कपड्यांच्या घड्या घालतांना आणि ते हाताळतांना मनात भाव निर्माण होणे : सद्गुरु अनुताई कपडे पुष्कळ व्यवस्थित आणि भावपूर्णपणे वापरतात. त्यामुळे या कपड्यांच्या घड्या घालतांना, तसेच त्यांना हाताळतांना माझ्या मनात आपोआपच भाव निर्माण होत होता. ‘ही सेवा परिपूर्ण आणि व्यवस्थित करावी’, असे विचार मनात येऊन माझ्याकडून तशी कृतीही होत होती.
१ इ २. ‘सद्गुरु अनुताईंचे कपडे एखाद्याच्या वृत्तीतही पालट करू शकतात’, असे वाटणे : एखाद्यामध्ये ‘पाट्याटाकूपणा’, ‘अव्यवस्थितपणा’ इत्यादी स्वभावदोष असले, तरी ही सेवा करतांना त्यालाही ‘ही सेवा व्यवस्थित करायला हवी’, असेच वाटेल. ‘सद्गुरु अनुताईंचे कपडे एखाद्याच्या वृत्तीतही पालट करू शकतात’, असे मला जाणवले.
परात्पर गुरु डॉक्टर आणि सद्गुरु अनुताई यांच्या कृपेने हे सर्व अनुभवण्याची संधी मिळाली. त्यासाठी त्यांच्या चरणी कृतज्ञ आहे.
२. सौ. कीर्ती जाधव
साधारणपणे कपडे नवीन असतांना ते आपल्याला अधिक आवडतात आणि आपण त्यांची व्यवस्थित काळजी घेतो. कपडे जुने व्हायला लागले की, आपले त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ लागते. सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी वापरलेल्या कपड्यांची जतन सेवा करतांना मला अनेक सूत्रे अनुभवायला मिळाली.
२ अ. सद्गुरु अनुताई यांच्या कपड्यांची वर्गवारी केल्यावर ‘सर्वच कपड्यांची स्पंदने सारखीच आहेत’, असे जाणवणे : सद्गुरु अनुताई यांचे काही चांगले, काही मध्यम जुने झालेले, तर काही जीर्ण झालेले कपडे होते. यांचे वैशिष्ट्य म्हणजे या तीनही प्रकारच्या कपड्यांची स्पंदने मला एकसारखीच जाणवली. ‘एखादा पंजाबी पोषाख किंवा साडी दिसायला चांगली किंवा त्यांचे कापड टिकायला चांगले आहे; म्हणून स्पंदने चांगली येत आहेत’, असे नव्हते. वरील सर्वच, म्हणजे अधिक वापरून जुन्या झालेल्या सर्वच कपड्यांची स्पंदने मात्र सारखीच येत होती.
२ आ. सद्गुरु अनुताई पुष्कळ प्रेमाने कपडे हाताळत असल्याने त्या कापड्यांकडे पाहून आनंद आणि उत्साह जाणवणे अन् कपड्यांना स्पर्श केल्यावर त्यात कृतज्ञताभाव जाणवणे : मी सद्गुरु अनुताई यांना त्यांच्या खोलीत कपडे हाताळतांना पाहिले आहे. एखाद्या सजिवाला किंवा बाळाला हातात घेतल्यानंतर ‘आपण त्याला कसे हाताळतो’, तसेच त्या कपडे हाताळतात. त्या पुष्कळ प्रेमाने आणि व्यवस्थितपणे कपड्यांच्या घड्या घालून ते व्यवस्थित ठेवतात. त्यांच्या कपडे हाताळण्याच्या कृतीकडे पाहूनही पुष्कळ छान वाटते.
मी जेव्हा त्यांच्या कपड्यांचे वर्गीकरण करण्याची सेवा करू लागले, तेव्हा मला या गोष्टीचे स्मरण झाले आणि त्या कपड्यांकडे पाहून आनंद अन् उत्साह जाणवला. सद्गुरु अनुताईंच्या मनात प्रत्येक वस्तूप्रती पुष्कळ कृतज्ञताभाव असल्याने त्यांच्या कपड्यांना स्पर्श केला असता पुष्कळ प्रेम आणि कृतज्ञताभाव जाणवतो. सद्गुरु ताई सर्व कृती पटपट करतात; परंतु त्यांची प्रत्येक कृती भावपूर्ण असते. त्यामुळे त्यांच्या कपड्यांची सेवा पूर्ण होईपर्यंत मला पुष्कळ आनंद आणि त्यांची प्रीती अनुभवता येत होती.
हे गुरुमाऊली, ‘सद्गुरु अनुताई प्रत्येक क्षणी भगवंताला अनुभवत असतात, त्याप्रमाणे मलाही भगवंताला अनुभवता येऊ दे’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’ (२१.१.२०२१ )
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |