सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी साधनेविषयी केलेले मार्गदर्शन

आज फाल्गुन कृष्ण पक्ष द्वादशी (८ एप्रिल) या दिवशी सनातनच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांनी साधकांना वेळोवेळी केलेले मार्गदर्शन आणि साधकांनी त्यांच्याविषयी केलेले लिखाण येथे देत आहोत.

सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर

सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांना वाढदिवसानिमित्त कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

१. स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया राबवणे आवश्यक

१ अ. अहं संदर्भातील दोन संघर्ष ! : ‘चूक न स्वीकारतांना जसा मनाला संघर्ष करावा लागतो, तसा तो चूक स्वीकारण्यातही करावा लागतो. यांतील पहिला संघर्ष आहे, तो अहंचा संघर्ष आणि दुसरा संघर्ष आहे, तो अहंविरुद्धचा संघर्ष !’

– (सद्गुरु) अनुताई (सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर)

१ आ. ‘स्वतःकडे लक्ष ठेवणे, नमते घेणे आणि ‘आपले प्रत्येक पाऊल देवाकडे जात आहे ना’, याकडे लक्ष ठेवणे, ही त्रिसूत्री लक्षात ठेवून अहं-निर्मूलनासाठी प्रयत्न करावेत.’

– (सद्गुरु) अनुताई (२.९.२०१९)

१ इ. मनात येणारे विचार मनमोकळेपणाने सांगण्याविषयी तारतम्य बाळगून केवळ मनामध्ये टिकून राहिल्याने आपल्याला त्रास होणार्‍या आणि साधनेवर परिणाम करणार्‍या विचारांचाच या संदर्भात विचार करा ! : ‘स्वभावदोष निर्मूलन-अहं निर्मूलन-गुणसंवर्धन प्रक्रियेच्या अंतर्गत मनातील अनावश्यक विचारांचे ओझे न्यून करण्यासाठी साधकांना मनमोकळेपणाने बोलण्यास सांगितले आहे. मनमोकळेपणाने बोलण्याने मनातील ताण न्यून होण्याबरोबरच पूर्वग्रह, विकल्प, नकारात्मक विचार यांसारखे दोषही न्यून होऊन प्रेमभाव वाढण्यासाठी साहाय्य होते; परंतु साधकांनी ‘मनमोकळेपणाने काय बोलावे आणि काय बोलू नये’, याबाबत तारतम्य न बाळगल्याने काही जणांमध्ये गैरसमज होत आहेत. मनातील सर्वच गोष्टी सांगता येत नाहीत. काही गोष्टी मर्यादित ठेवाव्या लागतात, याचे साधकांनी भान ठेवावे.

वाईट शक्तीही साधकांच्या मनात असंख्य निरर्थक, नकारात्मक आणि वासनेचे विचार घालतात. असे विचार सारणीत लिहिणे किंवा इतरांना सांगणे यापेक्षा प्रार्थना आणि आध्यात्मिक उपाय करणे यांकडे लक्ष देऊन ते घालविणे आवश्यक आहे.

मनाचे कार्य ‘विचार करणे’, हे असल्यामुळे आपल्या मनात असंख्य विचार येत असतात आणि जात असतात. जे विचार आपल्याला त्रासदायक ठरत नाहीत आणि मनात साठून रहात नाहीत, असे विचार सांगण्यात स्वतःचा आणि इतरांचा वेळ घालवू नये. याउलट जे विचार मनामध्ये टिकतात, ज्या विचारांमुळे आपल्याला त्रास होतो, ज्यांच्यामुळे साधनेवर परिणाम होतो, अशा विचारांसाठी ते सारणीत लिहिणे, त्यांच्यासाठी स्वयंसूचना देणे आणि ते फलकावर लिहिणे या प्रक्रियेतील पद्धतीनुसार उपाययोजना कराव्यात.’

– (पू.) अनुताई (२२.९.२०१२)

२. व्यष्टी साधना

२ अ. ‘विवाहामुळे आपण संसारात अडकतो आणि विवाह नाही केला, तर त्याच्या विचारांमध्ये अडकतो. केवळ साधनाच आपल्याला त्यातून बाहेर काढते.’ – कु. अनुराधा वाडेकर (२७.१०.२०११)

२ आ. ‘साधनेने मला काय मिळेल, हे मला ठाऊक नाही; पण जे काही मिळेल, ते फार अनमोल असेल’, असा साधनेविषयी दृष्टीकोन असावा !’ – सद्गुरु अनुताई (२९.३.२०१९)

२ इ. ईश्‍वराची भक्ती वाढवणे आवश्यक

२ इ १. ‘आपण अनेक जन्म कितीही प्रयत्न केले, तरी जे होऊ शकणार नाही, ते ईश्‍वराची, गुरूंची कृपा संपादन करण्यासाठी प्रयत्न केल्यास ईश्‍वर करतो !’ – (पू.) अनुताई (वर्ष २०१२)

२ इ २. ‘आपली भक्ती एवढी वाढायला हवी की, देवच आपल्यासमोर येऊन उभा रहायला हवा !’, असे एकदा प.पू. डॉक्टर म्हणाले होते. – (प.पू.) डॉ. आठवले (वर्ष २००१)

३. समष्टी साधना 

३ अ.  साधकांनो केवळ कार्य नव्हे, तर कार्यातून साधना करायची आहे, हे लक्षात घेऊन प्रत्येक कृती ईश्‍वराशी जोडा ! : ‘सर्वसाधारण साधकांमध्ये अहंचे प्रमाण चांगल्या साधकांपेक्षा अधिक असते. साधक करत असलेले कार्य साधना म्हणून न केल्याने त्यांच्या प्रगतीची गतीही मंदावते. त्यामुळे पुष्कळ कार्य करूनही अपेक्षित प्रगती होत नाही, याविषयी काही जणांना निराशाही येते. कितीही कार्य केले तरी तळमळ, भाव आणि श्रद्धा नसेल, तर आपण परिपूर्ण कार्य करू शकत नाही. कार्य ईश्‍वर करून घेणारच आहे. त्यामुळे कार्य करत असतांना आपण आपली साधना होते कि नाही याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कार्य करत असतांना साधना होण्यासाठी करत असलेल्या प्रत्येक कृतीला ईश्‍वराशी जोडता आले पाहिजे. असे झाले तरच ती कृती सेवा होते; अन्यथा ते कार्यच होते. हे साध्य होण्यासाठी साधकांनी भावजागृतीचे प्रयत्न वाढवावेत.

याची जाणीव सातत्याने रहावी यासाठी कृतीच्या स्तरावर आपल्या वहीवर, घरात पटकन लक्ष जाईल अशा ठिकाणी अथवा आपला वावर जास्त असतो अशा ठिकाणी ठळक अक्षरात ‘सेवेच्या माध्यमातून मला ईश्‍वराला जोडायचे आहे’ हे वाक्य लिहून ठेवावे.’ – (पू.) अनुताई (४.७.२०१२)

सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांच्याकडून साधकांना शिकायला मिळालेली सूत्रे

२ अ. सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी रेखाटलेले सनातन-निर्मित दुर्गादेवीचे चित्र म्हणजे साधकांना मिळालेली अनमोल भेटच ! : ‘समष्टीचे कल्याण हाच देवीचा स्थायीभाव आहे. हे आताच्या काळातील पुढील उदाहरणावरून आपल्याला अनुभवयाला मिळते. सनातन-निर्मित श्री दुर्गादेवीचे चित्र पाहिल्यावर आपल्याला साक्षात् श्री दुर्गादेवीचे दर्शन होते.

सनातनच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांना साक्षात् दुर्गादेवीने दर्शन दिले. त्यांच्यातील भावामुळेच देवीने त्यांच्यासमोर पाच घंटे उभे राहून ते चित्र त्यांच्याकडून काढून घेतले. ही सामान्य घटना नसून या घोर आणि रज-तम वाढलेल्या कलियुगात केवळ सनातनच्या साधकांसाठी नव्हे, तर अखिल मानवजातीसाठी देवीनेच तिचे दृश्य रूप भेटरूपात आपल्या सर्वांना प्रदान केले आहे. यासाठी आपण सर्वांनी जितकी कृतज्ञता व्यक्त करू, तितकी अल्पच आहे. या दिवसांत तिच्याप्रती मनोमन कृतज्ञ रहाण्याचा प्रयत्न करूया.’

– सौ. कीर्ती जाधव, कु. वैष्णवी वेसणेकर आणि कु. योगिता पालन, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (सप्टेंबर २०१७)

• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषीमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक