|
शासनाने जिल्हा रुग्णालयाला सर्व सुविधा देऊनही केवळ वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या हलगर्जीपणा अन् कामचुकारपणा यांमुळे रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी संबंधित वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करून त्यांच्यावर बडतर्फीची कठोर कारवाई केली पाहिजे, अशी जनतेची अपेक्षा आहे.
परभणी – येथील जिल्हा रुग्णालयात सारी प्रभागातील ६५ वर्षीय रुग्णाचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याचा आरोप करत रुग्णाच्या नातेवाइकांनी ३ एप्रिल या दिवशी पहाटे गोंधळ घातला. कर्तव्यावर असलेल्या कर्मचार्यांना नातेवाइकांनी मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर खासदार संजय जाधव, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर आणि पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी भोंगळ कारभार करणारे जिल्हा रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांच्यासह वैद्यकीय अधिकार्यांना सुनावले.
१. ६५ वर्षीय व्यक्तीची प्रकृती खालावल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. प्रकृती गंभीर झाल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले; मात्र प्रकृती गंभीर होऊनही रुग्णाला ऑक्सिजन देण्यात आला नाही. कर्मचार्यांना वारंवार सांगूनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप रुग्णाच्या नातेवाइकांनी केला. (वारंवार सांगूनही गंभीर स्थितीतील रुग्णाला ऑक्सिजन न देऊन हलगर्जीपणा करणार्या संबंधित कर्मचार्यांना कामावरून कायमचे काढून टाकले पाहिजे. – संपादक)
२. नातेवाइकांनी वैद्यकीय कर्मचार्यांना रुग्णाच्या मृत्यूचे नेमके कारण विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पळ काढल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. यानंतर नातेवाइकांनी वैद्यकीय अधिकार्यांना धारेवर धरले होते.
३. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रकाश डाके यांनी सारी प्रभागाला भेट देऊन नातेवाइकांशी चर्चा केली, तसेच ‘या प्रकरणी चौकशी करू’, असे आश्वासन दिल्यानंतर संतप्त झालेले नातेवाईक शांत झाले.
४. खासदार संजय जाधव आणि जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी तात्काळ बैठक घेऊन जिल्हा शल्यचिकित्सकांसह तेथील वैद्यकीय अधिकार्यांना सुनावले, तसेच जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी आरोग्य उपसंचालकांशी दूरभाषवरून चर्चा करून जिल्हा शासकीय रुग्णालयात चालू असलेल्या भोंगळ कारभाराविषयी अप्रसन्नता व्यक्त केली.
५. या बैठकीत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागरगोजे यांनी वैद्यकीय अधिकार्यांकडे दायित्वाचे वाटप न केल्याचे निदर्शनास आले, तसेच फिजीशियन सारी आणि कोरोना प्रभागाकडे फिरकत नसल्याचेही उघडकीस आले. (जिल्हा शल्यचिकित्सकाचा दायित्वशून्य कारभार ! असे वरिष्ठ अधिकारी काम करण्याच्या पात्रतेचे तरी आहेत का ? – संपादक)
६. या संदर्भात फिजीशियन यांनी ‘आम्हाला लिखित स्वरूपात आदेश नाहीत, आम्ही तिकडे जाऊन काम का करू ?’, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. (जिल्हाधिकार्यांना अशी उडवाउडवीची उत्तरे देणार्या फिजीशयन कर्मचार्यांचा उद्धामपणा किती आहे, हे दिसून येते. – संपादक) त्यामुळे जिल्हाधिकारी मुगळीकर, खासदार जाधव यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी या सर्व वैद्यकीय अधिकार्यांना फैलावर घेतले.
७. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागरगोजे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रकाश डाके आणि पोलीस अधिकारी यांनी नातेवाइकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र नातेवाईक आरोपांवर ठाम होते. त्यामुळे ‘या घटनेची अतिरिक्त जिल्हाधिकार्यांच्या वतीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल’, असे जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी सांगितले.