|
मुंबई – ४ एप्रिल या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर राज्यातील दळणवळण बंदीविषयीचे धोरण निश्चित करण्यात आले. मंत्रीमंडळात ठरलेल्या निर्णयानुसार ३० एप्रिलपर्यंत शनिवार आणि रविवार हे २ दिवस पूर्णत: दळणवळण बंदी असणार आहे, तर शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी रहाणार आहे. दिवसा जमावबंदी असेल, अशी माहिती अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.
याविषयी अधिक माहिती देतांना नवाब मलिक म्हणाले,
१. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात कडक नियमावली सिद्ध करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्याशीही चर्चा केली आहे.
२. मुख्यमंत्र्यांनी हॉटेल व्यावसायिक, उद्योजक, व्यायामशाळा चालक, चित्रपटसृष्टीतील मान्यवर यांच्याशीही चर्चा केली आहे. या सर्वांनी दळणवळण बंदीसाठी अनुमती दर्शवली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग पहाता त्याच्या विरोधात लढण्यासाठी सर्वांनी एकजूट दाखवली पाहिजे.
Guidelines for containment of COVID-19 #BreakTheChain pic.twitter.com/BLnOTaExc5
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 4, 2021
कसे असेल दळणवळण बंदीचे स्वरूप ?
१. उद्यान, चौपाट्या, मैदाने, धार्मिक स्थळे बंद रहातील. सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांवर बंदी असणार आहे. मंदिरात केवळ पुजार्याला पूजा करण्याची अनुमती असणार आहे.
२. सार्वजनिक आणि खासगी वाहतुकीवर कोणतेही निर्बंध नसतील. सर्व मॉल्स, रेस्टॉरंट, बार बंद ठेवण्यात येतील. घरपोच सेवा आणि अत्यावश्यक सेवा चालू रहातील.
३. शासकीय कार्यालये ५० टक्के क्षमतेने चालू रहातील. उद्योग पूर्ण क्षमतेने चालू ठेवण्यात येतील. कामगारांवर बंधने नसतील. कामगारांना रहाण्याची व्यवस्था असलेली बांधकामे चालू ठेवण्याला अनुमती असेल. सरकारी ठेकेदारांची बांधकामे चालू रहातील.
४. मंडईत निर्बंध नसतील; पण गर्दी अल्प करण्यासाठी नियम करण्यात आले आहेत.
५. अत्यावश्यक सेवेतील नागरिकांनाच संचारबंदीच्या काळात गाडी चालवण्यासाठी अनुमती असणार आहे.
६. फिरती दुकाने, हातगाड्या आणि पार्सल सेवा यांना अनुमती असणार आहे; मात्र अन्य दुकानांवर बंदी असणार आहे. औषधालये, बेकरी यांसह अत्यावश्यक सेवेतील दुकाने यांना अनुमती असणार आहे.
७. शासकीय कार्यालये, विमा आस्थापने, महानगरपालिकेशी संबंधित कार्यालये यांना अनुमती असणार आहे. चित्रपटगृहे, नाट्यगृहे यांना पूर्णपणे बंदी असणार आहे.
८. चित्रपट, मालिका आदींसाठी मोठ्या प्रमाणात चित्रीकरण करता येणार नाही.
९. कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण अधिक असलेल्या ठिकाणी निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आला आहे.
१०. लोकलगाड्या चालू ठेवण्यात येणार आहेत. अंत्यविधीसाठी २० जणांना अनुमती असेल.
११. खासगी कार्यालयांतील कर्मचार्यांना घरी राहून काम करण्याची सूचना असणार आहे.
१२. शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात येतील. मंत्रालय आणि विधीमंडळ या ठिकाणी भेट देणार्यांना प्रवेश नसेल.