हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये प्रशासनाला निवेदन
वाराणसी (उत्तरप्रदेश) – होळी, दुष्प्रवृती आणि अमंगल विचारांचा नाश करून सत्याचा मार्ग दाखवणारा उत्सव आहे. दुर्दैवाने अलीकडे या उत्सवाला विकृत स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे सामाजिक तणाव आणि महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. धार्मिक सणाचे पावित्र्य टिकून रहावे, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तरप्रदेशातील वाराणसी, बिहारमधील पाटणा आणि हाजीपूर या ठिकाणी प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.
‘काही नास्तिकतावाद्यांकडून कचर्याची होळी करा, होळीला नैवैद्य अर्पण करण्यापेक्षा तो गरिबांना दान करा’, असे अधार्मिक आणि श्रद्धेला हानी पोचवणारे उपक्रम चालवले जातात. यासमवेतच अमली पदार्थांचे सेवन करणे, रेव्ह पार्ट्यांचे आयोजन करणे, सार्वजनिक ठिकाणी रंग खेळणे, मद्यपान-धूम्रपान करणे आणि मद्याच्या मेजवान्या करणे यांवर प्रतिबंध करावा, तसेच अशा प्रकारे असामाजिक कृती करणार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. (प्रशासनाकडे अशी मागणी का करावी लागते ? – संपादक)