|
सोलापूर, ३० मार्च (वार्ता.) – येथील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालय येथे कोरोना पडताळणी करूनही ५ ते ६ दिवस कोरोना अहवाल न देता ‘तुमचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आहे’, असे तोंडी सांगितल्याने कोरोना पडताळणीविषयी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी श्री. धनंजय बोकडे यांनी रुग्णालय प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. (रुग्णालयात कोरोना अहवाल देण्यासाठी इतका विलंब होत असल्यास खरोखर ‘पॉझिटिव्ह’ रुग्णाला पुढील उपचार घेण्यास विलंब होऊ शकतो, तसेच त्याच्या माध्यमातून कोरोनाचा अधिक संसर्गही होऊ शकतो, त्यामुळे प्रत्येकाला अहवाल देण्याची प्रक्रिया जलद होण्यासाठी रुग्णालयाने गांभीर्याने उपायोजना करणे आवश्यक ! – संपादक)
श्री. बोकडे यांनी खासगी रुग्णालयात केलेली चाचणी मात्र ‘निगेटिव्ह’ आली असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. श्री. धनंजय बोकडे यांनी १९ मार्च या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालय येथे कोरोना पडताळणी केली होती; मात्र ५ ते ६ दिवस लोटूनही त्यांचा अहवाल दिला नाही आणि ‘तुमचा अहवाल पॉझिटिव्ह आहे’, असे तोंडीच सांगितले. श्री. बोकडे यांनी ‘पॉझिटिव्ह’ आलेला अहवाल दाखवण्याची विनंती करूनही तो दाखवला नाही. त्यानंतर श्री. बोकडे यांनी एका खासगी रुग्णालयात कोरोना पडताळणी केली असता त्यांचा अहवाल ‘निगेटिव्ह’ आला.
कोरोना अहवाल वेळेत न मिळाल्याने कुंभमेळ्याच्या धर्मप्रसारासाठी जाण्यास विलंब आणि मानसिक हानी झाली ! – धनंजय बोकडे, सोलापूरश्री. बोकडे यांनी रुग्णालयाला दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, या प्रकारामुळे रुग्णालयातील मनमानी कारभार समोर आला आहे. अहवाल वेळेत न मिळाल्याने मला कुंभमेळ्याच्या धर्मप्रसाराला जाण्यासाठी काढलेले आरक्षणही रहित करावे लागले, तसेच आर्थिक आणि मानसिक हानीही झाली आहे, ही हानीभरपाई रुग्णालय प्रशासनाने द्यावी. (अहवाल वेळेत प्राप्त होण्यासाठी नागरिकांना ताटकळत ठेवणार्या रुग्णालयावर कठोर कारवाई होणे आवश्यक ! – संपादक) |