पोट साफ होण्यासाठी रामबाण घरगुती औषध : मेथीदाणे

वैद्य मेघराज पराडकर

अनेकांना पोट साफ न होण्याची समस्या असते. या समस्येमुळे अनेक शारीरिक तक्रारी उद्भवतात. कित्येकजण प्रतिदिन पोट साफ होण्यासाठी औषधे घेतात. यांतील बहुतेक औषधांमुळे आतड्यांमध्ये कोरडेपणा उत्पन्न होतो. यामुळे पोट साफ न होण्याची समस्या बळावत जाते.

१. मेथीचे दाणे खाण्याची पद्धत

‘मेथीचे दाणे हे पोट साफ होण्यासाठी रामबाण औषध आहे. रात्री झोपतांना किंवा रात्रीचे जेवण झाल्यावर अर्धा चमचा मेथीचे दाणे थोड्याशा पाण्यासह औषधाची गोळी गिळतो त्याप्रमाणे न चावता गिळावेत. याने सकाळी उठल्यावर पोट साफ होते.

२. मेथीच्या दाणे असे कार्य करतात

मेथीचे दाणे पोटात गेल्यावर फुगतात आणि त्यांच्यातील बुळबुळीतपणामुळे ते आतड्यांतील मल पुढे ढकलतात. आतड्यांमध्ये आवश्यक तेवढे पाण्याचे प्रमाण मेथीच्या दाण्यांमुळे राखले जाते. यामुळे आतडी कोरडी पडत नाहीत. मेथीदाणे वात, पित्त आणि कफ या तीनही दोषांचे शमन करतात. मेथी हा आहारातील पदार्थ आहे. त्यामुळे अनेक दिवस मेथीदाणे प्रतिदिन घेतले, तरी कोणताही अपाय होत नाही. मेथीदाणे खाल्ल्याने नैसर्गिकरित्या शौचाला होते. जुलाब होत नाहीत. मेथी शक्तीवर्धकही आहे. त्यामुळे नियमित मेथीचे दाणे खाल्ल्याने थकवाही न्यून होतो.

३. कोठ्यानुसार मेथी दाण्यांचे प्रमाण

प्रतिदिन अर्धा चमचा मेथीचे दाणे खाऊन ते लागू पडले, तर दुसर्‍या आठवड्यामध्ये त्यांचे प्रमाण अल्प करून पहावे. न्यूनातिन्यून जेवढ्या प्रमाणात ते लागू पडतात, तेवढे प्रमाण नेहमी चालू ठेवावे. काही जणांचा कोठा अधिक क्रूर (जड) असतो. अशांना अर्धा चमचा मेथीदाणे खाऊन पोट साफ होत नाही. अशा लोकांनी मेथीदाण्यांचे प्रमाण प्रतिदिन अर्ध्या चमच्याने वाढवून पहावे. जे प्रमाण लागू पडते, ते नियमित घ्यावे. काहींना एका वेळेस ३ ते ४ चमच्यांपर्यंत मेथीदाणे घ्यावे लागू शकतात.

४. मेथीचे दाणे धुऊन वापरावेत

इतर पोट साफ होण्यासाठी वापरल्या जाणार्‍या औषधांपेक्षा मेथीदाणे कितीतरी स्वस्त आहेत. बाजारात जे मेथीचे दाणे मिळतात, त्यांवर रासायनिक फवारणी केलेली असू शकते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत वर्षभर पुरतील एवढे मेथीदाणे आणून धुऊन नीट वाळवून हवाबंद डब्यात भरून ठेवावेत आणि आवश्यकतेनुसार वर्षभर वापरावेत.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.३.२०२१)