प्रतिदिन चालण्याची आवश्यकता आणि त्यामुळे होणारे लाभ !

निरोगी जीवनासाठी व्यायाम – भाग २६

आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणार्‍या शारीरिक समस्यांवर ‘व्यायाम’ हा प्रभावी उपाय आहे. प्राचीन ग्रंथांतील व्यायामाचे तत्त्वज्ञान आजही तितकेच उपयुक्त असून आपण त्यातून प्रेरणा घेऊ शकतो. या लेखमालेतून आम्ही व्यायामाचे महत्त्व, व्यायामाविषयीच्या शंकांचे निरसन, ‘अर्गोनॉमिक्स’चे तत्त्व आणि आजारानुसार योग्य व्यायाम यांची माहिती सादर करणार आहोत. ‘पूर्वीच्या काळी कामानिमित्त दिवसाला २ – ४ मैल चालावेच लागत असे; पण आता ते काम वाहनांमुळे साध्य होत असल्याने आपण सहजच्या व्यायामाच्या मूलभूत अनुभवालाच मुकत आहोत. पूर्वी चालण्याला व्यायाम न समजता एक सहजक्रिया समजली जाई; पण आता आपण ते तितकेसे सहज करत नसल्यामुळे व्यायाम करायला सांगावे लागते. ‘चालल्याने कोणकोणते लाभ होतात’, ते येथे पाहूया.

या लेखाच्या आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/852336.html

१. प्रतिदिन चालण्याने होणारे लाभ 

१ अ. श्वसनक्रिया प्रभावीपणे होणे : ‘चालतांना पायांच्या मोठ्या स्नायूंचे आकुंचन आणि प्रसरण झाल्याने रक्ताभिसरण चांगले होते. चालण्याने श्वसन दीर्घ होऊन अधिक प्राणवायू ग्रहण केला जातो. त्यामुळे रक्त शुद्ध होते आणि शरीर अधिक प्राणवायू शोषून घेते. नुसते दीर्घश्वसन करण्यापेक्षा चालतांना अनायासे घडत असलेल्या या क्रियेचा अधिक लाभ संपूर्ण शरिराला होतो. प्रतिदिन चालण्याने नियमित श्वसनाची क्रिया अधिक प्रभावीपणे होऊ लागते.

१ आ. बद्धकोष्ठतेचा विकार दूर होणे : चालतांना पाय वर-खाली उचलून टाकावे लागल्यामुळे आतड्यांत मल पुढे ढकलण्यासाठी होत असलेल्या आकुंचन आणि प्रसरण या क्रियेला साहाय्य होते. त्यामुळे ‘सुदृढ व्यक्तीने प्रतिदिन ४ – ५ मैल (सुमारे ८ कि.मी.) चालल्यास बद्धकोष्ठतेचा विकार पूर्णपणे (साफ) नाहीसा होतो’, असे पूर्वीपासूनचे मत आहे.

१ इ. अन्नपचन होणे आणि भूक वाढणे : चालण्याने घाम येतो आणि त्वचेची सर्व रंध्रे मळ बाहेर टाकण्याची क्रिया नीट करू लागतात. घाम येऊन त्वचारंध्रे (चर्मरंध्रे) मोकळी होतात आणि शौचास साफ होते. त्यामुळे अन्नपचन चांगले होऊ लागते आणि भूक वाढते. ‘शरिरातील सर्व भागांवर चालण्याचा परिणाम चांगला होतो’, हे यातून लक्षात येते.

(साभार : मासिक ‘व्यायाम’, शं. धों. विद्वांस, संपादक, १५.२.१९५७)

श्री. निमिष म्हात्रे

२. चांगल्या आरोग्यासाठी व्यायाम म्हणून ‘चालणे’ आवश्यक !

२ अ. शरिराला कष्ट झाल्यास त्याला व्यायाम म्हणता येतो ! : वर उल्लेखित सर्व लाभ हे नेहमीपेक्षा जलद गतीने चालल्याने अनुभवायला मिळतात. मग ‘वैद्यकीय परिभाषेत ‘सर्वसाधारण चालणे’, याला व्यायाम म्हणावे कि नाही ?’, असा प्रश्न उत्पन्न होऊ शकतो. ‘चालल्याने व्यायाम होतो कि नाही ?’, हे व्यक्तीच्या स्थितीवर किंवा प्रकृतीवर अवलंबून आहे. आपण शरिराला आयास देणे (कष्ट देणे), यालाच व्यायाम म्हणता येते.

२ आ. चालण्याने कष्ट कोणाला होऊ शकतात ? : आजारी, वयस्कर किंवा पुष्कळच अशक्त यांच्यासाठी सर्वसाधारण गतीने चालणेसुद्धा कठीण असते. ‘ज्या गतीने अधिक वेळ चालणे कठीण वाटते’, त्यालाच व्यायाम म्हणता येते.

२ इ. चालणे सोपे किंवा सहज वाटू लागले की, त्याला व्यायाम म्हणता येत नाही आणि ती एक सहजक्रिया होते. त्यामुळे चांगल्या आरोग्यासाठी ‘चालणे’ हे एक व्यायाम म्हणून करणे आवश्यक आहे. सुदृढ व्यक्तींनी चालण्याऐवजी धावल्यास ते अधिक लाभ अनुभवू शकतात.’

– श्री. निमिष म्हात्रे, भौतिकोपचार तज्ञ, फोंडा, गोवा. (४.११.२०२४)

निरोगी जीवनासाठी ‘व्यायाम’ या सदरात प्रसिद्ध होणारे सर्व लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा –
https://sanatanprabhat.org/marathi/tag/exercise