‘सनराईज’ कोविड रुग्णालयाला लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू

भांडुप (मुंबई) येथील ‘ड्रिम्स मॉल’मधील दुर्दैवी घटना !

मुंबई – भांडुप येथील ‘ड्रिम्स मॉल’मधील ‘सनराईज’ या कोविड रुग्णालयाला लागलेल्या भीषण आगीत १० जणांचा मृत्यू झाला. २५ मार्चच्या रात्री अनुमाने १२ वाजता आग लागली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पहाणी केली. आगीमुळे मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येक मृताच्या कुटुंबियांसाठी सरकारने ५ लाख रुपये घोषित केले आहेत.

आग लागल्यानंतर अग्नीशमन दलाच्या २२ गाड्या घटनास्थळी पोचल्या. आग लागली, तेव्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अन्य रुग्णांना बाजूच्या कोविड रुग्णालयांत भरती करण्यात आले. घटनास्थळी भेट दिल्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘राज्यभरात असलेल्या कोविड रुग्णालयांच्या ठिकाणी अग्नीशामक यंत्रणा आहे का ?’ याची पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच ‘या दुर्घटनेमध्ये जे दोषी आढळतील, त्या सर्वांवर कठोर कारवाई करण्यात येईल’, असेही त्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेने शहरात केलेल्या सर्वेक्षणामध्ये २९ मॉलमध्ये अग्नीशामक यंत्रणा व्यवस्थित नसल्याचे आढळले आहे. या प्रकरणी कारवाई करण्याचे निर्देश महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांनी दिले आहेत.

उच्च न्यायालयाने स्वत:हून लक्ष घालून कारवाईचे आदेश द्यावेत ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

ही घटना अत्यंत गंभीर असून याविषयी मुख्यमंत्री आणि महानगरपालिका यांनी दायित्व घ्यावे. मुंबई महानगरपालिका भ्रष्टाचाराने पोखरली आहे. त्यामुळे ‘या दुर्घटनेप्रकरणी कारवाई होईल’, असे मला वाटत नाही. या प्रकरणी उच्च न्यायालयाने स्वत:हून लक्ष घालावे, असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. फडणवीस यांनी सनराईज रुग्णालयाला भेट दिल्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना ही मागणी केली.