(म्हणे) ‘होळी हा मद्यपान आणि अमली पदार्थ यांचे सेवन करण्याचा उत्सव !’

फरुखाबाद (उत्तरप्रदेश)  येथे शांतता समितीच्या बैठकीत शहर दंडाधिकारी अशोककुमार मौर्य यांचे हिंदुद्रोही विधान !

असे विधान अन्य धर्मियांच्या उत्सवाविषयी करण्याचे धाडस कुणी कधी प्रशासकीय अधिकारी दाखवत नाहीत; कारण त्याचे परिणाम त्यांना ठाऊक असतात, हे लक्षात घ्या !

फरुखाबाद शहर दंडाधिकारी अशोककुमार मौर्य यांच्या पुतळ्याचे दहन करतांना हिंदुत्ववादी

फरुखाबाद (उत्तरप्रदेश) – होळी एक असा उत्सव आहे ज्यामध्ये लोक मद्यपान करतात, नशा करतात. तो अमली पदार्थांचे सेवन करण्याचाही उत्सव आहे. यामुळे या काळात शहरात कोणत्याही संशयास्पद घटनांकडे प्रशासनाला सतर्कतेने लक्ष ठेवावे लागेल. जर तुम्हाला कुठेही मद्य आणि अमली पदार्थ यांची विक्री होत असल्याची माहिती मिळाली, तर लगेच पोलिसांना द्यावी, असे आवाहन येथील शहर दंडाधिकारी अशोककुमार मौर्य यांनी शांतता समितीच्या बैठकीत बोलतांना केले. या बैठकीत होळी आणि शब-ए-बारात या उत्सवांच्या संदर्भात नियोजनाविषयी चर्चा करण्यात आली.

फरुखाबाद शहर दंडाधिकारी अशोककुमार मौर्य

दंडाधिकारी मौर्य यांचे होळीविषयीचे विधान ऐकल्यावर येथे उपस्थित अधिवक्ता  डॉ. दीपक द्विवेदी संतापले. त्यांनी मौर्य यांना क्षमा मागण्यास सांगितले. (हिंदूंच्या सणांविषयी अयोग्य विधान करणार्‍यांचा तात्काळ विरोध करणारे अधिवक्ता डॉ. दीपक द्विवेदी यांचे अभिनंदन ! – संपादक) यानंतर हिंदु जागरण मंचाच्या कार्यकर्त्यांनी मौर्य यांच्या विरोधात चौक बाजारात निदर्शने करत त्यांचा पुतळा जाळला.