सहसाधकांचा आधारस्तंभ असणार्‍या आणि परिपूर्ण सेवा करून संतांचे मन जिंकणार्‍या कु. अंजली क्षीरसागर !

सहसाधकांचा आधारस्तंभ असणार्‍या आणि परिपूर्ण सेवा करून संतांचे मन जिंकणार्‍या रामनाथी आश्रमातील ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. अंजली क्षीरसागर !

फाल्गुन शुक्ल पक्ष सप्तमी (२०.३.२०२१) या दिवशी रामनाथी आश्रमात सेवा करणार्‍या कु. अंजली क्षीरसागर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या समवेत सेवा करणार्‍या साधकांना लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कु. अंजली क्षीरसागर

कु. अंजली क्षीरसागर यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

१. अनुभवाचा पुरेपूर वापर करणे

‘कु. अंजलीताईंनी आजवर विविध सेवा केल्या आहेत. त्यामुळे त्यांना त्या सेवांचा मोठा अनुभव आहे. त्या सध्या प्रसारसाहित्याच्या केवळ रचनेचे दायित्व किंवा नियोजन पहातात, असे नाही, तर संकलनातील अनेक गोष्टी त्यांना ज्ञात आहेत. संकलक म्हणून कितीतरी वेळा एखादे सूत्र मांडतांना मला अवघड जाते; मात्र ताई आल्या की, अगदी बोली भाषेत त्या सूत्राचे सार सांगून जातात. म्हणजे मी जे पुस्तकी लिखाण जमवलेले असते, त्याच्यापेक्षा सोपे, समाजाला कृतीशील करील, असे वाक्य त्या सहज येता-जाता सांगतात. त्यामुळे ते क्लिष्ट सूत्र सोपे होऊन जाते. त्यामुळे बहुतांश वेळा ‘कोणत्याही लिखाणाविषयी कु. अंजलीताईंना काय वाटते’, तेही विचारून घे’, असे पू. संदीप आळशी मला सांगत असतात.

श्री. सागर निंबाळकर

२. बैठकीनंतर स्वतःत सत्वर पालट करणे

एका बैठकीमध्ये सहसाधिकांनी कु. अंजलीताईंच्या पुष्कळ चुका सांगितल्या. त्यातील काही चुका ताईंना तत्क्षणी स्वीकारता आल्या नाहीत. त्या चुका स्वीकारणे जड गेले; मात्र नंतर त्यांनी त्या चुका स्वीकारल्या आणि त्यासाठी प्रयत्न चालू केले. नंतर संबंधित साधिका वा साधक यांच्यात कोणतेही अंतर येऊ न देता त्या अधिक मोकळेपणाने वागू लागल्या. या बैठकीच्या नंतर ताईंची साधनेची गती वाढून भावनाशीलता न्यून झाल्याचे लक्षात आले.

३. कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याची सिद्धता !

३ अ. घरातील सर्वजण रुग्णाईत असतांना आश्रमात राहून त्यांची काळजी घेणे : मध्यंतरी ताईंच्या घरातील ५ पैकी ४ जण आजारी होते. त्यांच्या वडिलांना रुग्णालयात भरती करायचे होते. तेव्हा अंजलीताईंनी आश्रमात बसूनच नागपुरातील आधुनिक वैद्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. एका आधुनिक वैद्यांनी एका दिवसाच्या ‘व्हिजिट’चे २ सहस्र ५०० रुपये मागितले. तेव्हा ताईंनी परखडपणे त्यांना सांगितले, ‘‘आपले मूल्य अवाजवी वाटते. हे योग्य नाही.’’  घरातील सर्वांचा नित्य आढावा घेणे, त्यांना नामजपादी उपाय कळवणे इत्यादी गोष्टी त्यांनी सहजतेने केल्या. या प्रसंगातून आम्हाला त्यांच्या गुरूंवरील श्रद्धेचे दर्शन झाले.

३ आ. स्वतःच्या सेवेव्यतिरिक्त अन्य सेवाही पुढाकार घेऊन करणे, त्यामुळे सहसाधकांनाही सेवेची प्रेरणा मिळणे : मध्यंतरी सेवेतील काही साधक आजारी पडले, तर कु. अंजलीताईंनी त्या सर्व साधकांच्या सेवा स्वतःकडे घेतल्या. अनेक साधकांचा समन्वय, त्यांच्या नियोजनासाठी, तसेच आवश्यक गोष्टींसाठी सर्व साहाय्य त्यांनी पुढाकार घेऊन केले. त्यांनी ‘माझी सेवा, माझे हे दायित्व’, असा कोणताही विचार केला नाही. त्यांच्यामुळे आम्हा सर्व सहसाधकांना इतकी प्रेरणा मिळाली की, त्या कठीण काळात सर्वजण अगदी सेवेशी एकरूप होऊन साधकांना साहाय्य करत होतो.

४. प्रसारसाहित्य सर्वांपर्यंत वेळेत पोचावे, यासाठी स्वतः समन्वय करणे

भारतभरात कोठेही प्रसारसाहित्य पोच करायचे असो किंवा त्यांच्याकडून आश्रमासाठी काही साहित्य मागवायचे असो, कु. अंजलीताई सदैव सिद्ध असतात. ‘कोरोना’ महामारीच्या काळात कोणती अंगडिया सेवा (कुरियर सर्व्हिस) चांगली आहे, गतीमान आहे’, याचा अभ्यास त्यांनी अल्पावधीत केला. त्यामुळे पंचांगांचे वितरण, ग्रंथांचे वितरण यांसाठी लवकर सुविधा उपलब्ध झाल्या आणि संबंधित प्रसारसाहित्य सर्वांपर्यंत वेळेत पोचले. हा समन्वय करतांना रात्रंदिन झटण्याची त्यांची सिद्धता असे.

५. चिकाटीने गुरुसेवेसाठी अविरत कार्यरत असणे

समन्वय करतांना त्यांची चिकाटीही दिसून येते. एखाद्या ‘कुरियर सर्व्हिस’वाल्याने नकार दिल्यास त्या अन्यांना संपर्क करतात. त्यांना कार्य सांगून अल्प व्यय आणि वेळ यांमध्ये ते साहित्य कसे पोचेल, हे पहातात. नवनवीन उत्पादनांच्या संदर्भातही त्या अभ्यासपूर्वक कृती करतात. त्या कुठेही तडजोड न करता गुरुसेवेसाठी अविरत कार्यरत असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी देव योग्य व्यक्ती अगदी वेळेत पाठवतो, ही नित्याची अनुभूती झाली आहे.

६. सहसाधकांना आधार वाटणे

अंजलीताईंच्या या विविध गुणांमुळे त्यांच्या समवेत सेवा करतांना मला सेवेतील आनंद मिळतो. माझ्या सेवांच्या संदर्भात येणार्‍या अडचणी ताईंना आपोआपच कळतात. त्यामुळे मला अंजलीताईंचा आधार वाटतो.

७. कु. अंजलीताई यांनी संतांचे मन जिंकणे

कु. अंजलीताईंनी विविध सेवा करून परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि पू. संदीप आळशी यांच्यासह सनातनच्या संतांची मने जिंकली आहेत. ताई त्या सेवांसाठी सर्व ते प्रयत्न करून ती सेवा वेळेत पूर्ण करतात. यामुळे त्यांची जलद आध्यात्मिक उन्नती होत आहे, हे पदोपदी जाणवते.

अशा प्रकारच्या विविध गुणांचा समुच्चय असलेल्या कु. अंजलीताईंच्या कडून शिकण्याची संधी ईश्‍वराने मला आणि सर्वच साधकांना दिल्याविषयी श्री गुरूंच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. सागर निंबाळकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.३.२०२१)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक