पणजी, १८ मार्च (वार्ता.) – कर्नाटक राज्याने म्हादईचे पाणी वळवल्याने म्हादईतील पाण्याची पातळी २० किलोमीटर अंतरापर्यंत शून्य झाली आहे, असे प्रतिपादन मगो पक्षाचे नेते श्री. सुदिन ढवळीकर यांनी केले आहे. गेल्या ३ दिवसांत पर्यावरणप्रेमी मधू गावकर यांनी काढलेली म्हादई नदीची छायाचित्रे श्री. सुदिन ढवळीकर यांनी दाखवली. या वेळी ते म्हणाले, ‘‘म्हादई नदी आता आमच्या हातात राहिलेली नाही. या नदीचे पाणी कळसा भंडुरा प्रकल्पाद्वारे मलप्रभा नदीत वळवण्यात आले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही गोष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नजरेस आणून दिली पाहिजे.’’ कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा येथील निरीक्षक अभियंत्यांचे पथक आज कळसा प्रकल्पाची पहाणी करणार.
केरी म्हादई नदीच्या पाणी वाटपावरून वादग्रस्त ठरलेल्या कळसा प्रकल्पाची पहाणी कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा येथील निरीक्षक अभियंत्यांचे पथक कणकुंबी येथील कळसा या जागी जाऊन १९ मार्च या दिवशी पहाणी करणार आहे. म्हादईचे पाणी अवैधपणे कर्नाटकात वळवण्याच्या प्रश्नी गोवा राज्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. या याचिकेवर विचार करतांना सर्वोच्च न्यायालयाने तिन्ही राज्यांच्या अभियंत्यांनी कळसा येथे जाऊन निरीक्षण करावे, असा आदेश २२ फेब्रुवारी २०२१ या दिवशी दिला आहे.
३ अभियंत्यांचे पथक कळसा येथे भेट देऊन त्यांच्या निरीक्षणाविषयीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयापुढे सादर करणार आहे. या पथकामध्ये गोवा राज्याचे अभियंते एम्.के. प्रसाद यांची नेमणूक केली आहे, अशी माहिती जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंते श्रीकांत पाटील यांनी दिली आहे. कर्नाटक राज्याकडून नेमणूक करण्यात आलेले मलप्रभा ‘लेफ्ट बँक कनाल सर्कल’चे निरीक्षक अभियंते नवीलुतीर्थ आणि महाराष्ट्र राज्याने नेमणूक केलेले निरीक्षक अभियंते विजयकुमार मोहिते या पथकामध्ये असणार आहेत. हा अहवाल ४ आठवड्यांत सादर करावा, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.