६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चिंचवड (पुणे) येथील कु. पार्थ मिलिंद चव्हाण (वय ६ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. पार्थ मिलिंद चव्हाण एक आहे !

(‘वर्ष २०१९ मध्ये कु. पार्थची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के होती.’ – संकलक)

‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ –  परात्पर गुरु डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कु. पार्थ चव्हाण

१. ‘पार्थ दिवसभर आनंदी असतो. त्याच्याशी बोलतांना आणि खेळतांना पुष्कळ आनंद वाटतो.

२. पार्थची आकलनक्षमता पुष्कळ अधिक आहे. एखादे सूत्र एकदा त्याला सांगितल्यावर पुन्हा सांगावे लागत नाही.

३. व्यवस्थितपणा

अ. तो स्वतःचे कपडे वाळत घालतो. त्यानंतर तो स्वतःच्या वाळलेल्या कपड्यांच्या घड्या घालून ते स्वतःच्या खणामध्ये ठेवतो. घरामध्ये कुणाचे कपडे अव्यवस्थित ठेवले असतील, तर तो ते नीट ठेवण्यासाठी प्रेमाने सांगतो.

आ. अभ्यास करतांना त्याने घेतलेली वह्या-पुस्तके इत्यादी गोष्टी तो अगदी व्यवस्थित जागेवर ठेवतो. त्याविषयी त्याला सांगावे लागत नाही. तो ते स्वयंस्फूर्तीने करतो.

४. स्वच्छतेची आवड

घरात कुठे एखादे जळमट किंवा अस्वच्छता दिसत असेल, तर तो ते स्वच्छ करण्यासाठी पुष्कळ प्रेमाने मला आठवण करून देतो आणि त्या सेवांमध्ये स्वतःहून मला साहाय्यही करतो.

५. तो प्रत्येक सूत्र मला किंवा त्याच्या बाबांना विचारूनच करतो.

६. प्रेमभाव

घरातील कुणीही व्यक्ती रुग्णाईत असेल, तर पार्थ त्याच्या परीने रुग्णाईत व्यक्तीची पुष्कळ काळजी घेण्याचा प्रयत्न करतो. त्या वेळी तो हळू आवाजात बोलतो. ती व्यक्ती झोपली असेल, तर तिच्या खोलीचे दार लावून घेतो. तो तिला पाणी आणि औषध देतो. हे सर्व तो अगदी मनापासून अन् पुष्कळ आनंदाने करतो.

७. परिस्थितीशी जुळवून घेणे

अ. पार्थ ४ वर्षांचा असतांना आम्ही पुणे येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या वेळी १५ दिवस पूर्णवेळ सेवेत होतो. त्या वेळी पार्थने कुणालाही त्रास दिला नाही. त्याने तेथील परिस्थितीशी सहजतेने जुळवून घेतले. त्यामुळे ही सेवा करतांना आम्हाला त्याच्यामुळे कुठलीही अडचण आली नाही.

आ. आम्ही रामनाथी आश्रमात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेसाठी गेलो होतो. तेव्हा पार्थ लहान असल्याने ‘त्याला तेथे जुळवून घेता येईल का ?’, असे आम्हाला वाटत होते; परंतु तिथे गेल्यानंतर तो पूर्वीपासूनच तिथे रहात असल्याप्रमाणे सर्व कार्यपद्धतींचे पालन करण्याचा प्रयत्न करत होता. फलकावरील सूचना त्याला वाचता येत नव्हत्या. तेव्हा तो समवेत असलेल्या साधकांना विचारून तशी कृती करण्याचा प्रयत्न करत होता.

इ. पार्थला लहानपणापासूनच फळे पुष्कळ आवडतात. रामनाथी आश्रमात असतांनाच एकदा मला सलग २ दिवस पेरू कापण्याची सेवा मिळाली होती. ती सेवा करतांना तो माझ्या समवेत तिथेच बसला होता; पण त्याने एकदाही पेरू मागितला नाही. महाप्रसादाच्या वेळी तो ताटात घेतलेल्या फोडी आवडीने खायचा. सर्वच साधकांना त्याचे पुष्कळ कौतुक वाटले.

८. लढाऊ वृत्ती

८ अ. आरंभी धनुष्य, गदा किंवा तलवार घेऊन खेळणे : पार्थ ‘स्वतः सूक्ष्म युद्ध करत आहे’, अशाच प्रकारचे खेळ खेळतो. आरंभी धनुष्य, गदा आणि तलवार ही त्याची खेळणी होती. तेव्हा तो ‘मी या शस्त्रांनी सूक्ष्मातील राक्षसांना मारत आहे’, असे सांगायचा. तो हे खेळ खेळतांना लढाऊ वृत्तीने घोषणा द्यायचा. त्या वेळी ‘त्याचे देवाशी पुष्कळ अनुसंधान आहे’, असे जाणवायचे.

८ आ. कोरोना महामारी चालू झाल्यापासून शस्त्रांनी युद्ध न करता तत्त्वांच्या साहाय्याने युद्ध करण्याचा खेळ खेळणे : कोरोना महामारी चालू झाल्यापासून पार्थ शस्त्रांनी युद्ध न करता ‘तत्त्वांनी युद्ध करतो’, असे सांगतो. ‘कुठल्या तत्त्वाचा कुठला रंग आहे ?’, हे ज्ञान त्याला आधीपासूनच आहे’, असे जाणवते, उदा. ‘वायुतत्त्वाचा पांढर्‍या किंवा तेजस्वी अग्नितत्त्वासाठी लाल या रंगांचा वापर करायला हवा’, हे ज्ञान त्याला आधीपासूनच आहे. पूर्वी ‘स्वतः शस्त्रांनी राक्षसांना मारत आहे’, अशा प्रकारचे खेळ खेळायचा. आता ‘तो वेगवेगळ्या अनिष्ट शक्तींना तत्त्वांनी हरवत आहे. त्याच्या हातातून वेगवेगळे तत्त्व वेगवेगळ्या दिशांना प्रक्षेपित होत आहे आणि त्यामुळे अनेक अनिष्ट शक्तींचे अन् राक्षसांचे निर्दालन होत आहे’, अशा प्रकारचे खेळ खेळतो.

हे खेळ खेळत असतांना त्याच्या डोळ्यांमध्ये लढाऊ वृत्ती जाणवते. तो त्यामध्ये रममाण झालेला असतो. तेव्हा ‘आजूबाजूला काय चालू आहे ?’, याकडेही त्याचे लक्ष नसते.

९. चुकांविषयीची संवेदनशीलता

९ अ. स्वतःमुळे इतरांना त्रास झाल्यावर रडू येणे : एकदा पार्थ पळत असतांना एका बालसाधिकेला धक्का लागून ती पडली. तेव्हा तो पुष्कळ रडत होता. मला वाटले, ‘त्यालाही लागले’; म्हणून मी त्याला तसे विचारले. तेव्हा तो म्हणाला, ‘‘माझ्यामुळे नेहमीच सर्वांना त्रास होतो’, याचे मला पुष्कळ वाईट वाटून रडू आले.’’ तेव्हा ‘त्याच्याकडून झालेल्या चुकीची त्याला पुष्कळ खंत वाटत आहे’, असे माझ्या लक्षात आले.

९ आ. सारणी लिखाण करण्याचे गांभीर्य : घरी असतांना मी, शर्वाणी (मुलगी) आणि श्री. मिलिंद (पती) सारणी लिखाण करत होतो. तेव्हा तो ‘मलाही माझ्या चुका लिहायच्या आहेत’, असा हट्ट करत होता. आम्ही त्याला समजावून सांगत होतो, ‘‘तू तुझ्या चुका आम्हाला सांग. आमच्यापैकी कुणीतरी त्या लिहून देईल’’; पण त्याला स्वतःच्या हाताने त्या चुका सारणीमध्ये लिहायच्या होत्या. शेवटी त्याने चित्र काढून त्यासमोर चूक अन् बरोबर अशी चिन्हे काढली, उदा. दूरदर्शनचे चित्र काढून त्या समोर चूक ‘× अशी खूण केली आणि ‘मी आज दूरदर्शनवरील कार्यक्रम पुष्कळ वेळ पाहिले’, ही माझी चूक झाली’, असे त्याने आम्हाला सांगितले. नंतर त्याने ताट आणि पेला यांचे चित्र काढून त्यासमोर चूक ‘× अशी खूण केली आणि ‘मी जेवण झाल्यावर माझे ताट अन् पेला उचलला नाही’, ही माझी चूक झाली’, असे आम्हाला सांगितले.

९ इ. चूक झाल्यावर क्षमायाचना करणे आणि प्रायश्‍चित्त घेणे : पार्थला कुणीही त्याची चूक सांगितली, तरी तो क्षमायाचना करतो. एखादी चूक त्याच्या लक्षात न आल्यास त्याला ‘ही तुझी चूक झाली आहे. तू क्षमायाचना करायला हवी’, असे समजावून सांगितल्यावर तो लगेच समोरच्या व्यक्तीची क्षमा मागतो आणि प्रायश्‍चित्त घेतो. प्रायश्‍चित्त घेतांना तो कुठलीही सवलत घेत नाही. तो स्वतःच्या चुकांसाठी ‘एक दिवस दूरदर्शन न पहाणे, ५ उठाबशा काढणे, साष्टांग दंडवत घालणे, आवडीचे चॉकलेट किंवा बिस्किट न खाणे’, अशा प्रकारची प्रायश्‍चित्ते स्वतःहून घेतो.

१०. सेवेची आवड

तो आश्रमात ‘गाजर धुणे, कणीस सोलणे, कणसाचे दाणे काढणे, वांगी धुणे’ अशा सेवा पुष्कळ मन लावून आणि एकाग्रतेने करतो. सर्व साधक त्याचे कौतुक करतात. एकदा ‘कणसाचे दाणे काढतांना तो कुणाशीही बोलला नाही अथवा त्याने मस्ती केली नाही. तो एकाग्रतेने सेवा करत होता’, असे एका साधिकेने मला सांगितले.

११. साक्षीभाव

वर्ष २०१९ मध्ये पार्थच्या चौथ्या वाढदिवसाला त्याची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित झाली आणि त्याचा सत्कार झाला. तेव्हा ‘तो त्या सत्काराकडे साक्षीभावाने पाहत आहे’, असे जाणवत होते.

१२. देवाची ओढ

पार्थला हनुमान आणि श्रीराम या देवता पुष्कळ आवडतात. पार्थला देवपूजा करायला पुष्कळ आवडते.

१३. भाव

१३ अ. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्याविषयी असलेला भाव

१३ अ १. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या चरणांकडे पाहून बोलणे : ‘सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्याविषयी त्याच्या मनामध्ये आदर आणि कृतज्ञताभाव आहे’, हे त्याच्या बोलण्यातून आणि कृतींमधून जाणवते. तो सगळ्यांशी पुष्कळ मस्ती करतो किंवा खोड्या काढतो; मात्र सद्गुरु स्वातीताई समोर असतांना तो अतिशय शांत बसतो. तो त्यांच्याशी बोलतांना मान वर करून पहात नाही. ‘त्याची दृष्टी त्यांच्या चरणांकडे आहे’, असे जाणवते.

१३ अ २. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी सांगितल्याप्रमाणे झोपून नामजप न करता बसून नामजप करण्याचा प्रयत्न करणे : सद्गुरु स्वातीताई ‘ऑनलाईन’ सत्संगात जी सूत्रे सांगतात, ती सूत्रे तो कृतीत आणण्याचा प्रयत्न करतो. एकदा सद्गुरु स्वातीताईंनी नामजप झोपून न करता बसून करण्याचे महत्त्व सांगितले. हा सत्संग चालू असतांना तो आजूबाजूला खेळत होता. तेव्हा ‘त्याचे लक्ष खेळण्यात आहे’, असे आम्हाला वाटले; परंतु रात्री कोरोनाच्या प्रतिबंधनासाठी असलेला नामजप करतांना त्याला पुष्कळ झोप येत असूनही तो बसूनच नामजप करण्याचा प्रयत्न करत होता. तो म्हणाला, ‘‘सद्गुरु स्वातीताईंनी बसून नामजप करण्यास सांगितले आहे; म्हणून मी झोपू शकत नाही.’’ तो बसूनच नामजप करत होता. शेवटी बसून नामजप करतांना त्याला बसल्या जागीच झोप लागली.

१३ आ. एका संतांप्रती असलेला भाव : एकदा आम्हाला एका संतांचा सत्संग लाभला. तेव्हा त्यांनी ‘तुला काही बोलायचे आहे का ?’, असे त्याला विचारले. तेव्हा त्याने सांगितले, ‘‘मला काही बोलायचे नाही. केवळ नमस्कार करायचा आहे.’’ त्याने त्यांच्या चरणांवर डोके ठेवून नमस्कार केला. तेव्हा त्यांनी त्याचे पुष्कळ कौतुक केले.

१४. दैवी वैशिष्ट्य

पार्थच्या कपाळावर नेहमी ‘ॐ’ दिसतो.

१५. कृतज्ञता

पार्थला घरी सगळे जण लाडाने ‘कान्हा’ म्हणतात. त्याला बोलावतांना पुष्कळ वेळा मला मी ‘भगवान श्रीकृष्णालाच बोलावत आहोत’, असे जाणवून भावजागृती होते. ‘त्याची अध्यात्मिक पातळी वाढली असावी’, असे मला वाटते. अशा गुणी आणि दैवी बाळाचा सहवास दिल्याविषयी गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !

‘पार्थमध्ये असणारे दैवी गुण आमच्यामध्ये येण्यासाठी आमच्याकडून तळमळीने आणि भावपूर्ण प्रयत्न करवून घ्या’, अशी श्री गुरुचरणी प्रार्थना आहे.’

– श्री. मिलिंद चव्हाण (वडील) आणि सौ. मंजिरी चव्हाण (आई), चिंचवड, पुणे. (२४.१.२०२१)


यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.          

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक