आयुक्तांच्या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ नाही
सांगली, ३ मार्च – सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगली महापालिकेचे ७१० कोटी रुपयांचे आणि ४३ लाख रुपये शिलकीचे वर्ष २०२१ साठीचे अंदाजपत्रक ३ मार्च या दिवशी स्थायी समितीला सादर केले. या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही. या वेळी उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील, नगरसचिव चंद्रकांत आडके उपस्थित होते.
या संदर्भात आयुक्त म्हणाले, प्रशासनाच्या अंदाजपत्रकात रस्ते विकास, क्रीडांगण विकास, भुयारी गटार योजना, महापालिका शाळा विकास, पाणीपुरवठा, तसेच जलनिस्सारण यांसाठी तरतूद आहे. महिला बालकल्याणसाठी आहे, तेवढीच तरतूद धरण्यात आली आहे. अखर्चित निधी पुढील वर्षामध्ये वर्ग करण्यात आला असून तोही वापरता येणार आहे. शहराच्या प्रदूषणविषयक उपायांसाठी शासनाच्या सूचनेनुसार २५ कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे.