लैंगिक अत्याचाराच्या तक्रारीनंतर कर्नाटकच्या जलसंपदामंत्र्यांकडून त्यागपत्र

नोकरीचे आमीष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप

देशातील बहुतेक पक्षांच्या नेत्यांच्या किंवा मंत्र्यांच्या विरोधात अशा प्रकारचे आरोप केले जात आहेत. यातून सर्वपक्षांचे नेते एकाच माळेचे मणी आहेत, हेच लक्षात येते ! अशांची निष्पक्षपणे चौकशी होईल का ? असा प्रश्‍न जनतेच्या मनात येणे संयुक्तिक आहे !

रमेश जारकीहोळी

बंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकमधील भाजप सरकारमधील जलसंपदामंत्री आणि बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या विरोधात २५ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि नागरी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश कलहळ्ळी यांनी ही तक्रार केली आहे. के.पी.टी.सी.एल्.मध्ये (कर्नाटक पॉवर ट्रान्समिशन कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये) नोकरीचे आश्‍वासन देत हा अत्याचार करण्यात आल्याचे यात म्हटले आहे. दिनेश कलहळ्ळी यांनी पीडित तरुणी आणि जारकीहोळी यांच्यातील खासगी क्षणांची एक सीडी प्रसारित केली आहे. रमेश जारकीहोळी हे पूर्वी काँग्रेसमध्ये होते. विरोध झाल्यानंतर जारकीहोळी यांनी पदाचे त्यागपत्र दिले.

या तक्रारीनंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी रमेश जारकीहोळी यांच्या विरोधात निदर्शने केली. त्यांनी जारकीहोळी यांच्या त्यागपत्राची मागणी केली. या आरोपाविषयी जारकीहोळी म्हणाले की, हे एक राजकीय षड्यंत्र आहे. याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि गुन्हेगारांच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे.