भाजप आमदारांकडून आर्णी नगरपालिकेत अपहार करणार्‍या बांधकाम अभियंत्याला निलंबित करण्यासाठी गोंधळ !

  • आमदार डॉ. संदीप धुर्वे यांचा वरील दालनातून सभागृहात उडी मारण्याचा प्रयत्न !
  • ८ दिवसांत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्‍वासन

विधानसभा प्रश्‍नोत्तरे…

मुंबई – यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी नगरपालिकेतील बांधकाम अभियंता आणि कंत्राटदार यांनी संगनमत करून मान्सूनपूर्व कामात लाखो रुपयांचा अपहार केला असल्याने बांधकाम अभियंता नीलेश राठोड यांना निलंबित करण्यात यावे, अशी आग्रहाची मागणी आर्णी येथील आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी विधानसभेत २ मार्च या दिवशी प्रश्‍नोत्तरात केली. या वेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उत्तराने त्यांचे समाधान न झाल्याने, तसेच राठोड यांना निलंबित करण्याचा आदेश न दिल्याने आमदार डॉ. धुर्वे यांनी सभागृहाच्या वरील दालनातून खाली सभागृहात उडी मारण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी इतर सदस्यांनी त्यांना आवरल्याने पुढील अनर्थ टळला. या प्रश्‍नावरून विधानसभेत जोरदार चर्चा झाली आणि सदस्यांनी गोंधळही घातला. शेवटी मंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपहाराची ८ दिवसांत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले.

प्रारंभी आमदार धुर्वे म्हणाले की, आर्णी नगरपालिकेत झालेल्या गैरव्यहाराची तक्रार नगरसेवक लक्ष्मण पठाडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. त्यामुळे भ्रष्टाचार करणार्‍यांवर कारवाई कधी करणार ? नीलेश राठोड यांना कधी निलंबित करणार ? तसेच आर्णी येथे ७ वर्षे पाणीपुरवठा यंत्रणा रखडलेली आहे, ती पूर्ण कधी करणार ? नगरपालिकेला ५० लाख रुपयांचा निधी कधी देणार ?

मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, या नगरपालिकेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी समिती नियुक्त केली आहे. तहसीलदारांच्या वतीने चौकशी करण्यात येत असून २ शाखा अभियंता आणि साहाय्यक अभियंता त्यांना साहाय्य करण्यासाठी देण्यात आले आहेत. चौकशी पूर्ण झाल्यावर दोषींवर कारवाई करण्यात येईल. चौकशी करण्यापूर्वी दोषींना निलंबित करता येत नाही.

याला हरकत घेतांना आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, २७ नोव्हेंबर २०२० या दिवशी तक्रार करूनही तहसीलदारांनी अजूनही चौकशी का केली नाही ? याला ७७ दिवस का लागतात ? यातून कोणाला पाठीशी घातले जात आहे ? चौकशीपूर्वीच अभियंता राठोड यांच्या निलंबित करायला हवे.

अशीच मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही केली.

आमदार नाना पटोले म्हणाले की, आमदार धुर्वे हे उडी मारून खाली येण्याचा प्रयत्न करत आहेत. ते कसेही वागत आहेत. सभागृहात काय चालले आहे ?

संसदीय कार्यमंत्री अनिल परब या वेळी म्हणाले की, आत्महत्या करणे गुन्हा आहे, त्यामुळे आमदार डॉ. धुर्वे यांनी खाली उडी मारू नये.