मुलीची छेड काढण्याच्या तक्रारीवरून आरोपींकडून पित्याची गोळ्या झाडून हत्या

उत्तरप्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे वाजलेले तीन तेरा !


हाथरस (उत्तरप्रदेश) – येथील नौजरपूर गावात मुलीची छेड काढणार्‍याच्या विरोधात तक्रार केल्याच्या अडीच वर्षांपूर्वीच्या वादातून मुलीच्या वडिलांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अमरिश शर्मा असे मुलीच्या वडिलांचे नाव आहे. या घटनेची नोंद घेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आरोपींच्या विरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्याचा आदेश दिला आहे. जुलै २००८ मध्ये शर्मा यांनी गौरव शर्मा याच्या विरोधात मुलीची छेड काढल्यावरून पोलिसांत तक्रार केल्यावर त्याला अटक करण्यात आली होती. एक मासानंतर त्याला जामीन मिळाला होता.

गौरवची पत्नी आणि मावशी गावातील एका मंदिरात पूजेसाठी गेली होती. तेथे अमरिश शर्मा यांच्या दोन्ही मुली दिसल्यावर त्यांच्यात वाद झाला. याची माहिती मिळाल्यावर गौरव आणि अमरीश शर्मा तेथे पोचले. गौरव याने त्याच्या काही साथीदारांना दूरभाष करून तेथे बोलावून अमरिश शर्मा यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या केली. पोलिसांनी यांतील दोघांना अटक केली आहे.