मध्यप्रदेशात मिशनरी शाळेकडून हिंदु महिला ग्रंथपालावर धर्मांतरासाठी दबाव !

धर्मांतर न केल्याने नोकरीवरून काढले !

  • केंद्र सरकारने लवकरात लवकर धर्मांतरविरोधी कायदा संमत करून अशांना कठोर कारवाई होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !
  • कॉन्व्हेंट शाळा धर्मांतराचे अड्डे बनत असून त्यांना वठणीवर आणण्यासाठी सरकारी यंत्रणांनी कृती करणे आवश्यक !

खजुराहो (मध्यप्रदेश) – येथील कॅथोलिक चर्चकडून चालवण्यात येणार्‍या सिथित सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर भाग्या यांच्यावर शाळेच्या ग्रंथपाल रूबी सिंह यांनी धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आरोप करत पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रूबी सिंह या गरीब असल्याचे पाहून त्यांचे वेतन रोखले होते आणि त्यांच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकला होता. हिंदु धर्माचाही सिस्टर भाग्या यांनी अवमान केला होता. रूबी सिंह यांनी धर्मांतर करावे, यासाठी त्यांचे वेतन वाढवण्याचे, तसेच नोकरीवर त्यांना नियमित करण्याचे आमीषही दाखवण्यात आले होते. रूबी सिंह यांनी धर्मांतरास नकार दिल्यावर त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले. गेल्या ४ वर्षांपासून त्या कंत्राटी पद्धतीवर शाळेत काम करत होत्या. या घटनेची माहिती हिंदुत्वनिष्ठ संघटनांना मिळाल्यावर त्यांनी रूबी सिंह यांच्यासह पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. त्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला.

दुसरीकडे मध्यप्रदेश कॅथोलिक चर्चच्या जनसंपर्क अधिकारी मारिया स्टीफन यांनी म्हटले की, मिशनरी शाळेला लक्ष्य केले जात आहे. विद्यार्थी आणि त्यांचे आईवडील यांच्याकडून तक्रारी मिळाल्यानंतरच रूबी सिंह यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले. त्यापूर्वी त्यांना चेतावणीही देण्यात आली होती; मात्र त्यांच्यात कोणताही पालट न झाल्याने कारवाई करावी लागली.