पालकांनो, मराठी भाषेचे महत्त्व, तसेच इंग्रजी भाषेमुळे होणारी हानी जाणून आपल्या पाल्यांना मराठी माध्यमातून शिक्षण द्या !

 भाषेविषयीमध्ये नाविन्यपूर्ण अद्वितीय संशोधन करणारे  महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

२७ फेब्रुवारी २०२१ या दिवशी ‘मराठी राजभाषादिन’ आहे. यानिमित्ताने…

‘हिंदु राष्ट्रात इंग्रजीत नव्हे, तर मातृभाषेत शिक्षण देण्यात येईल !’, असे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती का म्हणतात, हे पुढील लेखावरून लक्षात येईल !’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले     

‘सध्याच्या जागतिकीकरणाच्या युगात आपल्या पाल्यांना पुढे नोकरी-व्यवसाय यांत येणार्‍या आव्हानांचा यशस्वी सामना करता येण्यासाठी इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणे लाभदायक आहे’, असा विचार बरेच पालक करतात. ‘राज्यासह देशातील जागतिकीकरणाची परिस्थिती विचारात घेता पालकांचा कल इंग्रजी माध्यमाकडे असल्याने मराठी अनुदानित शाळांची पटसंख्या न्यून होत चालली आहे. यामुळे शासकीय मराठी शाळांचे अनुदान कायम ठेवून त्यांना पूर्ण इंग्रजी माध्यमात परावर्तित करण्यात यावे’, अशी मागणी करण्यात येते. या अनुषंगाने ‘इंग्रजी आणि मराठी माध्यमातून शिकण्याचा परिणाम’, या संदर्भातील काही महत्त्वाच्या सूत्रांचा ऊहापोह या लेखात केला आहे.

डॉ. (सौ.) नंदिनी सामंत

१. मराठी माध्यमाच्या तुलनेत इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणे कठीण आणि निकृष्ट दर्जाचे असणे

आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमातून शिकवण्यात पालक धन्यता मानत असले, तरी प्रत्यक्षात इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणे, हे कोणत्याच दृष्टीने लाभदायक नसून उलट हानीकारक आहे, असे जगभरातील, तसेच देशातील शिक्षणतज्ञांचे अभ्यासपूर्ण मत आहे. यासंदर्भातील काही सूत्रे पुढीलप्रमाणे आहेत.

अ. संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘युनेस्को’चा अहवाल म्हणतो, ‘मातृभाषेतून शिक्षण घेतलेल्या बालकांची आकलन शक्ती आणि गुणवत्ता परक्या भाषेतून शिक्षण घेतलेल्या बालकांपेक्षा अधिक चांगली असते’.

आ. मातृभाषेतून बालवाडी ते पदवी शिक्षण देणारे फ्रान्स, जर्मनी, जपान, चीन, रशिया या देशांनी भारतापेक्षा वेगाने प्रगती केली आहे.

इ. कोणतीही गोष्ट मातृभाषेतून लवकर आणि चांगली समजते. राष्ट्रीय, तसेच बहुराष्ट्रीय उद्योग प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक भाषेत विज्ञापने करतात. ‘इंग्रजीत विज्ञापने केल्यास धंदा कमी; पण ग्राहकांच्या मातृभाषेतील विज्ञापनांमुळे धंदा वाढतो’, असा त्यांचा अनुभव आहे. सारे जग शिक्षण, उद्योग, व्यापार या क्षेत्रांत मातृभाषेला महत्त्व देते.

ई. एका सामाजिक संस्थेतर्फे कोलकाता, देहली, मुंबई आणि चेन्नई येथील १४२ नामवंत शाळांमधील इयत्ता ५ वी ते ७ वी यांतील ३२ सहस्र मुलांची चाचणी घेण्यात आली. ‘इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांचे ज्ञान वरवरचे असते. ते  केवळ पाठांतरावर अवलंबून असल्याने मातृभाषेतून शिक्षण घेणार्‍यांच्या तुलनेत त्यांची अभिव्यक्ती त्रोटक असते’, असे त्यात आढळले.

उ. ‘मराठी शाळेतील मुलांना इंग्रजीतून उच्च शिक्षण घेणे अवघड जाते’, हा महाराष्ट्र्रातील सर्वांत जुना समज आहे. वस्तूतः १० वीपर्यंत मराठीत शिकल्यानंतर विज्ञान शाखेत इंग्रजीतून शिकणार्‍यांना केवळ पहिले दोन मास अडचण येते. १० वीपर्यंत इंग्रजी माध्यमात शिकलेल्यांना भाषेची अडचण येत नाही; पण विविध विषय समजण्यात खूप अडचण येते. हा लाखो विद्यार्थ्यांचा अनुभव आहे.

ऊ. माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांनी केलेल्या पहाणीत ‘मराठी माध्यमातून शिकणार्‍या मुलांनी इंग्रजीतून घेतलेल्या उच्च शिक्षणात अधिक प्रगती केली’, असे आढळले आहे.

ए. गेल्या ११० वर्षांत दहावीच्या निकालात मराठी माध्यमातून शिकणारा विद्यार्थी कायम महाराष्ट्रात पहिला आला आहे. एकदाही इंग्रजी माध्यमातून शिकणारा विद्यार्थी महाराष्ट्रात पहिला येऊ शकलेला नाही. गुणांच्या उतरत्या क्रमाने दरवर्षी पहिल्या एक लाख विद्यार्थ्यांत ८०,००० हून अधिक विद्यार्थी मराठी माध्यमातून शिकणारे असतात.

ऐ. मातृभाषेतून शिकल्यामुळे डॉ. माशेलकर, डॉ. वसंत गोवारीकर यांनी जागतिक दर्जाची कामगिरी केली.

२. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने ‘भाषा आणि लिपी’ यांच्या संदर्भात केलेल्या अभिनव संशोधन प्रयोगातून इंग्रजी भाषा आध्यात्मिक स्तरावर हानीकारक, तर मराठी भाषा लाभदायक असल्याचे स्पष्ट होणे

भाषेतून (लिखित किंवा बोलण्याच्या माध्यमातून) सूक्ष्म सकारात्मक किंवा नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत असतात. ‘लिहिणारा-वाचणारा’, तसेच ‘बोलणारा-ऐकणारा’ या दोघांवरही भाषेतील स्पंदनांचा परिणाम होत असतो. एखाद्या समाजातील प्रमुख भाषेचा तेथील संस्कृतीवर व्यापक स्तरावर परिणाम होत असतो. ‘विविध भाषांतील स्पंदने आणि त्यांचा व्यक्तींवर होणारा परिणाम’ अभ्यासण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ (यू.ए.एस्.) या ऊर्जा अन् प्रभावळ मापक यंत्राच्या माध्यमातून काही चाचण्या करण्यात आल्या. या चाचणीच्या अंतर्गत संस्कृत, बंगाली, हिंदी, मराठी, कन्नड, तेलुगु, तमिळ अन् मल्याळम् या ८ राष्ट्रीय आणि अरबी, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, ग्रीक, इब्री (यहुदी), मलय (इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर येथे बोलली जाणारी भाषा), मंदारिन (चीनमध्ये बोलली जाणारी भाषा), पोर्तुगीज, रशियन आणि स्पॅनिश या ११ विदेशी भाषांचा व्यक्तीवर होणारा परिणाम अभ्यासण्यात आला. या भाषा ‘त्यांची जगभरातील लोकप्रियता, तसेच त्यांचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व’ या निकषांवर निवडण्यात आल्या होत्या. या संशोधनापैकी इंग्रजी आणि मराठी या भाषांच्या चाचण्यांची संक्षिप्त माहिती येथे देत आहोत.

‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे वस्तू, वास्तू, प्राणी किंवा व्यक्ती यांच्यातील नकारात्मक ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा आणि एकूण प्रभावळ (ऑरा) मोजता येते. सामान्य व्यक्ती किंवा वस्तू यांमध्ये नकारात्मक ऊर्जा असू शकते; परंतु सकारात्मक ऊर्जा असेलच, असे नाही. सामान्य व्यक्ती किंवा वस्तू यांची एकूण प्रभावळ (ऑरा) साधारण १ मीटर असते.

यू.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. रूपेश रेडकर

‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’

वाचकांना सूचना : जागेअभावी या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

२ अ. चाचणी क्र. १ : इंग्रजी आणि मराठी या भाषांमधील लिखीत मजकुरातील सूक्ष्म स्पंदनांचा अभ्यास – यासाठी ‘सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्‍चिमेला अस्ताला जातो’, हे वाक्य मराठी आणि इंग्रजी या भाषांमध्ये लिहिण्यात आले. दोन्ही भाषांतील वरील वाक्याचा स्वतंत्र प्रिंटआऊट काढण्यात आला. त्यानंतर प्रत्येक प्रिंटआऊटमधील सूक्ष्म ऊर्जेचा अभ्यास ‘यू.ए.एस्.’च्या माध्यमातून करण्यात आला. या चाचणीतील मोजण्यांच्या नोंदी पुढीलप्रमाणे आहेत.

निष्कर्ष

इंग्रजी भाषेतील लिखाणात पुष्कळ प्रमाणात नकारात्मक स्पंदने, तर अत्यल्प प्रमाणात सकारात्मक स्पंदने आढळली. याउलट मराठी भाषेतील लिखाणात नकारात्मक स्पंदने अजिबात नव्हती आणि सकारात्मक स्पंदने पुष्कळ प्रमाणात आढळली.

या चाचणीतून ‘मराठी भाषेतून वाचन करणार्‍यांना किती मोठ्या प्रमाणात सकारात्मकतेचा लाभ होत असेल आणि याउलट नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित करणार्‍या इंग्रजी भाषेतून वाचन करणार्‍यांना त्यातील नकारात्मकतेचे किती दुष्परिणाम भोगावे लागत असतील’, हे आपण समजू शकतो. प्रत्येक दिवशी कळत-नकळत कितीतरी विज्ञापने, फलक, संकेतस्थळे, तसेच सामाजिक माध्यमे यांच्या माध्यमातून आपण इंग्रजी भाषेतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांच्या प्रभावळीत वावरत असतो. या स्पंदनांचा आपल्यावर किती दूरगामी अनिष्ट परिणाम होत असतो, याची आपल्याला कल्पनाही नसते !

२ आ. चाचणी क्र. २ : देवनागरी लिपीतील भाषांमध्ये सर्वाधिक सकारात्मकता का आहे ? – भाषा आणि लिपी यांच्या संदर्भातील या प्रयोगातील वरील चाचणी क्र. १ मध्ये जगभरातील १९ भाषांमध्ये देवनागरी लिपीतील भाषांमध्ये सर्वाधिक सकारात्मकता आढळली होती. याचे कारण शोधण्यासाठी या भाषेतील ध्वनीघटकांच्या (phonemesच्या) संदर्भात एक चाचणी करण्यात आली. यासाठी देवनागरी लिपीतील एक व्यंजन (म) आणि एक स्वर (अ) निवडण्यात आले आणि प्रयोगातील अन्य भाषांमध्ये या ध्वनीघटकांशी जुळणारे ध्वनीघटक शोधण्यात आले. यासाठी ती ती भाषा मातृभाषा असलेल्या व्यक्तींचे साहाय्य घेण्यात आले. त्या त्या भाषेतील या ध्वनीघटकांशी जुळणार्‍या ध्वनीघटकाचा प्रिंटआऊट काढून त्याची ‘यू.ए.एस्.’च्या माध्यमातून चाचणी करण्यात आली. या चाचणीतील इंग्रजी आणि मराठी भाषांचे निष्कर्ष पुढीलप्रमाणे आहेत.

२ आ १. ‘म’ ध्वनीघटकातील सूक्ष्म स्पंदने : इंग्रजी भाषेतील प्रिंटआऊटमध्ये सकारात्मक, तसेच नकारात्मक स्पंदने आढळली; तर मराठी भाषेतील प्रिंटआऊटमध्ये केवळ सकारात्मक स्पंदने आढळली.

२ आ २. ‘अ’ ध्वनीघटकातील सूक्ष्म स्पंदने : इंग्रजी भाषेतील प्रिंटआऊटमध्ये केवळ नकारात्मक स्पंदने आढळली; तर मराठी भाषेतील प्रिंटआऊटमध्ये केवळ सकारात्मक स्पंदने आढळली.

या चाचणीतून लक्षात येते की, देवनागरी लिपीतील व्यंजन आणि स्वर यांत सकारात्मकता होती.

२ आ ३. देवनागरी लिपीतील अक्षरांमध्ये सात्त्विकता असण्याचे कारण : ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यातील शक्ती एकत्रित असतात’, हा अध्यात्मातील नियम आहे. याचा अर्थ असा होतो की, प्रत्येक ध्वनीशी संबंधित विशिष्ट आकार असणार. त्या आकाराशी जेवढे अधिक जुळणारे त्या त्या भाषेतील ते अक्षर असेल, तेवढी त्यातून अधिक सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणार. ‘म’ आणि ‘अ’ ही अक्षरे त्याच्याशी संबंधित ध्वनीशी सर्वाधिक जुळणारी आहेत. या अक्षरांतून सर्वाधिक सकारात्मकता आढळण्याचे हे प्रमुख कारण आहे. देवनागरी लिपीतील सर्व अक्षरांच्या संदर्भात हे सूत्र लागू आहे. इंग्रजीच्या संदर्भात अक्षरे त्याच्याशी संबंधित ध्वनीशी जुळणारी असतातच असे नाही, उदा. ‘अ’ हा ध्वनी इंग्रजीत ‘A’ किंवा ‘Uh’, अशा भिन्न अक्षरांनी लिहिला जाऊ शकतो.

आपल्या ऋषिमुनींनी सहस्रो वर्षांपूर्वी कोणतेही स्थूल प्रयोग न करता, केवळ आपल्या साधनेच्या बळावर सूक्ष्मातून ‘ध्वनीशी संबंधित विशिष्ट आकारानुसार प्रत्येक अक्षर असणे आवश्यक असते’, हे तत्त्व जाणले, तसेच सूक्ष्मातून प्रत्येक अक्षराचे नेमके आकार जाणून त्यायोगे ते परिपूर्ण अशा देवनागरी लिपीची निर्मिती करू शकले !

२ इ. चाचणी क्र. ३ : भाषेचा ऐकणार्‍या व्यक्तींवर होणारा परिणाम – या चाचणीसाठी पहिल्या चाचणीतील वाक्य मराठी आणि इंग्रजी भाषांमध्ये लिहिण्यात आले. ती ती भाषा उत्तम रितीने बोलणार्‍या व्यक्तीच्या आवाजात त्या त्या वाक्याचे ध्वनीमुद्रण करण्यात आले. चाचणीत सहभागी आध्यात्मिक साधना न करणार्‍या २ व्यक्तींच्या (एकाला सूक्ष्मातील अनिष्ट शक्तींचा त्रास होता, तर दुसर्‍याला नव्हता) चाचणीच्या आरंभी ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे ‘मूलभूत नोंदी’ करण्यात आल्या. त्यानंतर दोन्ही व्यक्तींना इंग्रजी भाषेतील ध्वनीमुद्रण १० मिनिटे ऐकवण्यात आले. हे ध्वनीमुद्रण ऐकल्यानंतर त्या व्यक्तींवर झालेला परिणाम ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे मोजण्यात आला. त्यानंतर २० मिनिटांचा कालावधी त्या भाषेचा परिणाम ओसरण्यासाठी देण्यात आला. त्यानंतर मराठी भाषेतील ध्वनीमुद्रण १० मिनिटे ऐकवण्यात आल्यावर व्यक्तींवर झालेला परिणाम मोजण्यात आला. चाचणीतील कोणत्याही व्यक्तीची त्या भाषांमध्ये भावनिक गुंतवणूक नव्हती. या चाचणीतील निष्कर्ष पुढील तक्त्यात देण्यात आले आहेत.

वरील तक्त्याचा अभ्यास केल्यावर लक्षात येते की, दोन्ही व्यक्तींवर इंग्रजी भाषेचा नकारात्मक परिणाम झाला; म्हणजे त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा वाढली. याउलट त्यांनी मराठीमधील वाक्याचे ध्वनीमुद्रण ऐकल्यावर त्यांच्यातील नकारात्मकता पुष्कळ प्रमाणात कमी झाली आणि त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली.

वरील चाचण्यांच्या निष्कर्षातून स्पष्ट होते की, इंग्रजी भाषेतील लिखित मजकुराचा, तसेच ती बोलण्याचा व्यक्तीवर आध्यात्मिक स्तरावर हानीकारक परिणाम होतो. हा परिणाम आध्यात्मिक स्तरावर असल्याने तो जीवनाच्या प्रत्येक अंगावर हानीकारक परिणाम करतो. याउलट जीवनाच्या प्रत्येक अंगावर मराठी भाषेचा सकारात्मक परिणाम होतो. हे सूत्र लक्षात घेऊन आपल्या पाल्यांना त्यांची हानी करणार्‍या इंग्रजी माध्यमातून शिकवण्यापेक्षा जीवनावर सखोल सकारात्मक परिणाम करणार्‍या मराठी भाषेतून शिक्षण द्या !’

– आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (६.६.२०२०)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक