राऊरकेला (ओडिशा) येथील श्री. प्रेमप्रकाश सिंह यांनी दळणवळण बंदीच्या कालावधीत मोतीबिंदूचे शल्यकर्म करण्याच्या वेळी अनुभवलेली गुरुकृपा !

श्री. प्रेमप्रकाश सिंह

१. दळणवळण बंदीमुळे वाराणसी येथील सेवाकेंद्रात रहाण्याची संधी मिळणे

‘मी १५.३.२०२० या दिवशी वाराणसी येथील सेवाकेंद्रात सेवा शिकण्यासाठी आलो होतो. ‘१० दिवस सेवा शिकून परत राऊरकेला येथे जायचे’, असे नियोजन होते; परंतु कोरोना महामारीमुळे २२.३.२०२० पासून संपूर्ण देशात दळवळण बंदी घोषित करण्यात आली. दळणवळण बंदीचा कालावधी वाढत गेल्याने मला सेवाकेंद्रातच थांबावे लागले. सेवाकेंद्रात मला समष्टी सेवेची संधी मिळाली.

२. या कालावधीत डोळ्यांचे दुखणे वाढल्याने नेत्र चिकित्सकांकडे जाणे आणि त्यांनी मोतीबिंदूचे शल्यकर्म करून घेण्यास सांगणे

या कालावधीत माझे डोळ्यांचे दुखणे वाढले. त्यामुळे मी एका साधकाच्या समवेत वाराणसी येथील प्रख्यात नेत्र चिकित्सक डॉ. अनिल तिवारी यांच्याकडे गेलो. ते सनातनचे हितचिंतक होते. रुग्णालयात गर्दी असूनही माझी नेत्र तपासणी लवकर झाली. नेत्र तपासणीनंतर डॉ. तिवारी यांनी ‘डोळ्यांमध्ये मोतीबिंदू वाढल्याने लवकरात लवकर शल्यकर्म करून घ्या’, असे सांगितले.

३. शल्यकर्म करण्यासाठी येणार्‍या व्ययाचा विचार करत असतांनाच नेत्र चिकित्सकांचा दूरभाष येणे आणि त्यांनी ‘व्ययाची चिंता करू नका. सर्व व्यय आमच्या वतीने करू’, असे सांगणे

शल्यकर्म करण्यासाठी मला ४.१०.२०२० या दिवशी रुग्णालयात वेळेवर येण्यास सांगितले. रुग्णालयातून येतांना मी तेथील साहाय्यकाला शल्यकर्मासाठी येणार्‍या व्ययाविषयी विचारले. त्यांनी ‘२० ते २५ सहस्र रुपये व्यय येईल’, असे सांगितले. त्याविषयी विचार करत असतांनाच डॉ. तिवारी यांचा दूरभाष आला आणि त्यांनी सांगितले, ‘‘व्ययाची चिंता करू नका. सर्व प्रकारच्या तपासण्या करून घ्या. सर्व व्यय आमच्या वतीने करू.’’ त्यांच्या या उत्तरामुळे मी भारावून गेलो. शल्यकर्म करून घेण्याचा मला थोडा ताण आला होता; पण गुरुकृपेने त्याचे भय राहिले नाही.

जेव्हा कधी माझी जीवननौका या संसाररूपी सागरात गटांगळ्या खाऊ लागते, तेव्हा प.पू. गुरुदेवांच्या कृपारूपी दोरीमुळे ती तरून जाते. जेव्हापासून मी प.पू. गुरुदेवांच्या चरणी शरण आलो आहे, तेव्हापासून प.पू. गुरुदेवांनी मला फुलासारखे सांभाळले आहे.

४. शल्यकर्म करण्यापूर्वी ताण येऊन भय वाटणे, प.पू. गुरुदेवांच्या पादुकांसमोर जाऊन प्रार्थना केल्यावर मन शांत होणे आणि पू. नीलेश सिंगबाळ यांच्याकडून मार्गदर्शन घेण्याविषयी मनात विचार येणे

शल्यकर्म करण्यापूर्वी १ दिवस मला ताण आला होता आणि भय वाटत होते. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘सेवाकेंद्रातील प.पू. गुरुदेवांच्या पादुकांसमोर जाऊन प्रार्थना केल्यावर निश्‍चित मार्ग निघेल.’ प.पू. गुरुदेवांच्या पादुकांसमोर प्रार्थना करत असतांनाच माझे मन शांत झाले. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘सेवाकेंद्रात पू. नीलेशदादा (पू. नीलेश सिंगबाळ) आहेत. ते प.पू. गुरुदेवांचे सगुण रूप आहेत. त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊया.’

५. पू. नीलेशदादा बोलत असतांना ‘प.पू. गुरुदेवच बोलत आहेत’, असे जाणवणे आणि त्यांचे आश्‍वासक बोल ऐकून मन शांत होणे

मी पू. नीलेशदादांना माझी मनःस्थिती सांगितली. पू. नीलेशदादा माझ्याशी बोलत असतांना ‘प.पू. गुरुदेवच बोलत आहेत’, असे मला जाणवले. पू. दादांचे आश्‍वासक शब्द ऐकताच माझे मन शांत झाले. पू. दादांनी सांगितलेले सर्व आध्यात्मिक उपाय करून मी स्वतःला शल्यकर्मासाठी सिद्ध केले.

६. पू. नीलेशदादा यांनी गुरुकृपेनेच शल्यकर्म होत असल्याची जाणीव करून देणे  आणि त्यानंतर गुरूंचे महत्त्व लक्षात येणे

दुसर्‍या दिवशी अल्पाहाराच्या वेळी पू. दादांच्या जवळ बसण्याची संधी मिळाली. त्या वेळी पू. दादा मला म्हणाले, ‘‘डॉ. तिवारी यांनी तुम्हाला शल्यकर्मासाठी स्वतःहून दूरभाष करून बोलावले’, ही तुमच्यासाठी पुष्कळ मोठी अनुभूती आहे. हे गुरुकृपेमुळेच शक्य झाले आहे; कारण ते सदैव आपल्या शिष्यांचे परम मंगल होण्याचीच इच्छा करतात. त्यांची आपल्या शिष्यांवर कृपादृष्टी असतेच. आपणच हे अनुभवण्यास न्यून पडतो.’’ त्या वेळी मला गुरूंचे महत्त्व लक्षात आले.

जो नहीं दे सका कोई आज तक ।
पूज्य गुरुदेव वह दे दिया आपने ॥ १ ॥

मेरे प्राण में, प्रेरणा में, भाव, संवेदना, बुद्धि को श्रेष्ठ चिंतन दिया आपने ।
भाव, संवेदना शून्य था, वो सब दे दिया आपने ॥ २ ॥

७. शस्त्रकर्म करण्यासाठी पलंगावर पहुडल्यावर आपोआप प्रार्थना होणे आणि प्रार्थना करत असतांना ‘शस्त्रकर्म कधी झाले ?’, हे न कळणे

४.१०.२०२० या दिवशी शल्यकर्म करण्यासाठी पलंगावर पहुडल्यावर माझ्याकडून प.पू. गुरुदेवांना आपोआप प्रार्थना होऊ लागली.
हे गुरुदेव,
मैं जैसा भी हूं, आपकाही हूं । आपके चरण पकड़ा हूं ।
घरद्वार सब छोडा हूं । जीवनसे खेला हूं ।
दुखों का मारा हूं । मेरे सारे दोष, दुःख मिटा देना ।
तुम हो अंतर्यामी, मैं दीन, हीन, चंचल, अभिमानी, अज्ञानी ।
तुमने जो दृष्टि फेरी, तो मेरा कौन ठिकाणा होगा ।
गुरुदेव दया करके, मुझे अपना बनाए रखना ।
मै शरण पडा तेरी, चरणों में जगह देना ॥

‘मी ही प्रार्थना करत असतांना २० – २५ मिनिटे कशी गेली ?’, हे मला कळलेच नाही. तेवढ्यात आधुनिक वैद्य मला म्हणाले, ‘‘उठून बसा. तुमचे शल्यकर्म झाले आहे.’’ त्यानंतर वैद्यांनी मला आवश्यक त्या सूचना दिल्या.

या सर्व प्रसंगात मी प.पू. गुरुदेवांची कृपा अनुभवत होतो. प.पू. गुरुदेवांनी मला आपल्या हातात घेऊन फुलासारखे सांभाळले. त्या वेळी माझ्या अंतर्मनातून एकच आवाज येत होता, ‘प.पू. गुरुदेव कृतज्ञता, कृतज्ञता, कृतज्ञता !’

– श्री. प्रेमप्रकाश सिंह, राऊरकेला, ओडिसा.(११.१२.२०२०)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक