सातारा, २३ फेब्रुवारी (वार्ता.) – कोरोना काळातील लसीकरण, किसान सन्मान योजना, विनामूल्य गॅसचे वाटप या योजना राबवल्याचे मोदी सरकार सांगत आहे; परंतु सरकारी तिजोरीतून वाटलेल्या पैशांहून अधिक पैसे मोदी सरकारने जनतेच्या खिशातून काढले आहेत. इंधन दरवाढ करून लोकांवर बोजा टाकण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या आडमुठेपणामुळेच इंधन आणि गॅस यांची भाववाढ झाली आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली. येथील काँग्रेस कमिटीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आमदार पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले की, इंधनावर केंद्र सरकारने भरमसाठ कर लादलेला आहे. तो अल्प केला, तरी इंधनदर अल्प होतील. मोदींनी एका हाताने दिले आणि दहा हातांनी लोकांकडून काढून घेतले आहे. पाकिस्तानमध्ये ५१ रुपयांना पेट्रोल मिळत आहे; मात्र आपल्याकडे आर्थिक तूट भरून काढण्यासाठी इंधनावर भरमसाठ कर लादण्यात आला आहे. तो मोदींनी अल्प करण्याचा निर्णय घ्यावा. इंधन दरवाढ ही मागील सरकारच्या चुकीच्या आयात धोरणांमुळे झाल्याचे मोदी सरकार सांगत आहे. आम्ही यासाठी मोदी सरकारसमवेत खुली चर्चा करण्यासाठी सिद्ध आहोत. देशात ८५ टक्के तेल आयात केले जाते. आम्ही जे केले, ते खुलेपणाने मांडले आहे.