सातारा, २२ फेब्रुवारी (वार्ता.) – लोकसभा आणि विधानसभा यांच्या प्रचारासाठी सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेसची शेवटची प्रचार सभा झाली होती. ही सभा केवळ राष्ट्रवादीच्या पदाधिकार्याने एका छायाचित्रकाच्या साहाय्याने टिपली होती. या वेळी कोणीही पत्रकार उपस्थित नव्हते, असे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. यामुळे सातारा येथील पत्रकारांचा अपमान झाला असून सातारा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने याचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला.
सातारा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने २० फेब्रुवारी या दिवशी जिल्हा माहिती कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी सर्व पत्रकारांनी त्यांना अभिवादन केले. या वेळी जिल्हा पत्रकार संघाच्या पदाधिकारी यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याचा निषेध केला.
सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावर खासदार शरद पवार यांची शेवटची प्रचार सभा झाली होती. प्रचंड पावसात ही सभा पार पडली होती. मोठा पाऊस असल्याने कोणीही पत्रकार तेथे उपस्थित नव्हते. या ठिकाणी केवळ राष्ट्रवादीच्या पदाधिकार्याने या सभेचे ध्वनीचित्रीकरण केले. त्यानंतर ही सभा प्रसारीत केली, असे विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी केले होते. या विधानावर खासदार सुळे यांनी क्षमा न मागितल्यास आत्मक्लेश आंदोलन करून सातारा येथील पत्रकारांची काय शक्ती आहे ते दाखवू, अशी चेतावणी सातारा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आली आहे.