आतंकवादाचा बीमोड कधी ?

‘शांत शहर’ म्हणून पुणे शहराचा लौकिक पुसून टाकणार्‍या कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाला १३ फेब्रुवारी २०२१ या दिवशी १० वर्षे पूर्ण झाली; मात्र या बॉम्बस्फोटातील ७ पैकी ४ आरोपी अद्याप पसार आहेत. त्यांच्या मुसक्या कधी आवळल्या जाणार ? हा प्रश्‍न जनतेच्या मनात आहेच. या बॉम्बस्फोटात १७ जणांचा मृत्यू, तर ५६ जण घायाळ झाले होते. पाठोपाठ २ वर्षांनीच म्हणजे २ ऑगस्ट २०१२ या दिवशी जंगली महाराज रस्त्यावर ५ बॉम्बस्फोट घडवण्याचा प्रयत्न झाला होता. त्याआधी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति मंदिरातही स्फोट घडवण्याचा प्रयत्न सतर्क फुल विक्रेत्यामुळे अयशस्वी ठरला होता. पुण्यातील ओशो आश्रम, छबाड हाऊस, लाल देऊळ ही ठिकाणे आतंकवाद्यांच्या रडारवर असल्याचे उघड झाले होते. आंतरराष्ट्रीय आतंकवादी डेव्हिड हेडलीने वर्ष २००८ मध्ये पुण्यात २ दिवस कोरेगाव पार्कमध्ये वास्तव्य केल्याचे त्या वेळी उघड झाले होते. पुढे या हेडलीचा मुंबईवरील आतंकवादी आक्रमणातही हात असल्याचे अन्वेषणात निष्पन्न झाले. वादग्रस्त ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चे मुख्यालय यापूर्वी संभाजीनगरला होते. त्यांनी ते नुकतेच पुण्यातील कोंढवा येथे स्थलांतरित केले. या स्फोटातील प्रमुख संशयितांनी त्यांचे बस्तान पाकिस्तानात बसवल्याची माहिती आहे.

मुंबईवरील आक्रमणात पाकचाच हात असल्याचे ढळढळीत पुरावे हाती असूनही भारताने पाकवर आजपर्यंत कठोरातील कठोर कारवाई केली नाही. पाक येथील आतंकवाद्यांच्या निर्मितीचे कारखाने चालू असल्याने भारताने कितीही आतंकवाद्यांना ठार केले, तरी आतंकवादी संपत नाहीत, ही वस्तूस्थिती आहे. आतंकवाद नष्ट करण्याची क्षमता भारतीय निमलष्करी दल आणि सैन्यदल यांच्यात आहे. तरी त्यांना ते नष्ट करण्याची मोकळीक दिली जात नाही. ज्या देशाला आतंकवादाची समस्या भेडसावते, तो देश स्वत:च्या ताकदीवर आतंकवादाचा बीमोड करतो. इस्रायल, ब्रिटन, फ्रान्स, रशिया आदी देश त्याची उत्तम उदाहरणे आहेत. भारतातील आतंकवाद नष्ट करायचा असेल, तर त्यासाठी त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे निःस्वार्थी आणि प्रखर राष्ट्रभक्त असणारे शासनकर्ते आवश्यक आहेत, हेच खरे !

– सौ. अपर्णा जगताप, पुणे