जळगाव – श्रीराम मंदिर निधी संकलन अभियान पूर्ण झाले असूनही निधी संकलनासाठी बनावट पावती पुस्तक सिद्ध करून पैसे गोळा करण्याचा प्रकार १८ फेब्रुवारी या दिवशी शहरातील गोलाणी मार्केट येथे घडला. याविषयी माहिती मिळताच नागरिकांनी त्या बनावट पावती फाडणार्याला चांगलाच चोप देत शहर पोलिसांच्या कह्यात दिले. तसेच त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला.
जिल्हा श्रीराम मंदिर निधी समर्पण समितीच्या वतीने १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत जळगाव शहरासह जिल्ह्यात ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र निधी समर्पण अभियान’ राबवण्यात आले होते. या भामट्याने बजरंग दलाचा उल्लेख करत ‘श्रीराम मंदिर निधी संकलन’ पावती सिद्ध केली होती. त्याने अनेकांकडून पावत्यांही फाडल्याचे दिसत होते. हा प्रकार समजताच बजरंग दल, विश्व हिंदू परिषद यांच्या पदाधिर्यांनी गोलाणी मार्केटमध्ये धाव घेतली. त्या व्यक्तीस पावतीविषयी विचारणा केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यानंतर पदाधिकार्यांनी त्याच्याकडून बनावट पावती पुस्तक घेत त्याला शहर पोलिसांच्या कह्यात दिले.