नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रभागानुसार प्रारूप मतदार सूची प्रसिद्ध

नवी मुंबई – राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-२०२१ मतदार सूचीचा कार्यक्रम निश्‍चित करण्यात आला आहे. त्यासाठी प्रभागानुसार प्रारूप मतदार सूची सिद्ध करण्यात आल्या आहेत. १६ फेब्रुवारीपासून या सूची प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. २३ फेब्रुवारी २०२१ (सार्वजनिक सुट्टीसह) या कालावधीपर्यंत मतदार सूचींवर नागरिकांकडून हरकती आणि सूचना कार्यालयीन वेळेत स्वीकारण्यात येणार आहेत, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त तथा निवडणूक अधिकारी अभिजीत बांगर यांनी दिली आहे.

या मतदार सूची महानगरपालिकेचे मुख्यालय आणि संबंधित प्रभागाच्या विभाग कार्यालयांचे सूचना फलक, महापालिकेचे संकेतस्थळ यांवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. हरकती आणि सूचना यांचा प्रारूप नमुना या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. नागरिकांनी या नमुन्यातच हरकती आणि सूचना सादर कराव्या. मुदतीनंतर प्राप्त हरकती आणि सूचना यांचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घेण्यात यावी, असे आवाहन अभिजीत बांगर यांनी केले आहे.