गणेशोत्सवामध्ये जलप्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांना शाडू मातीच्या श्री गणेशमूर्ती उपलब्ध करून द्या ! – हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर आयुक्तांना निवेदन

महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

कोल्हापूर, १७ फेब्रुवारी (वार्ता.) – गेली अनेक वर्षे कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये गणेशमूर्ती विसर्जनामुळे होणारे जलप्रदूषण रोखण्याच्या नावाखाली श्री गणेशमूर्ती विसर्जन न करता दान करण्याची अशास्त्रीय मोहीम शहरात राबवली जाते. हिंदु धर्मानुसार ‘श्री गणेशमूर्ती वहात्या पाण्यात विसर्जन करावी’, असे शास्त्र आहे. मूर्तीदानाच्या धर्मद्रोही उपक्रमामुळे गणेशभक्तांची इच्छा असूनही ते आपल्या प्रथा-परंपरा यांचे आचरण करू शकत नाहीत. तरी गणेशोत्सवामध्ये जलप्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांना शाडू मातीच्या श्री गणेशमूर्ती उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने कोल्हापूर महापालिका आयुक्त तथा महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना १७ फेब्रुवारी या दिवशी निवेदन देण्यात आले.

या वेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, शिवसेना करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव, शिवसेनेचे श्री. किशोर घाटगे, हिंदुत्वनिष्ठ श्री. रामभाऊ मेथे आणि श्री. शरद माळी, हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे, श्री. बाबासाहेब भोपळे आणि श्री. शिवानंद स्वामी उपस्थित होते.

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे म्हणाले, ‘‘हिंदूंना त्यांच्या प्रथा-परंपरेनुसार श्री गणेशोत्सव साजरा करता यावा, यांसाठी कोल्हापूर महानगरपालिकेने श्री गणेशभक्तांना शाडूमातीच्या आणि नैसर्गिक रंगात रंगवलेल्या श्री गणेशमूर्ती उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा.’’

आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,

१. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने गणेशमूर्ती विसर्जनामुळे जलप्रदूषण होऊ नये यासाठी  शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनवण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये समाजसेवी संस्थांच्या साहाय्याने शाडू मातीच्या गणेशमूर्ती विक्रीसाठी केंद्रेही उभारली जातात. शासकीय आदेशानुसार, जलप्रदूषण रोखण्यासाठी शाडू मातीच्या आणि नैसर्गिक रंगानी रंगवलेल्या श्री गणेशमूर्ती उपलब्ध करून देण्याविषयी सांगितले आहे.

२. त्यासाठी मूर्तीकारांना आवाहन करून शाडूच्या मूर्ती बनवण्याचे महत्त्व सांगून त्यांच्याकडून शाडू मूर्तींची विक्री केली जाईल, याची निश्‍चिती करण्याचे नियोजन करावे. त्यामुळे भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकास त्याच्या धर्मानुसार आचरण करण्याचा जो अधिकार दिला आहे, त्यानुसार समस्त हिंदु बांधवांना त्यांच्या प्रथा-परंपरेनुसार श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन करण्याचा अधिकार पुन्हा मिळावा. तसेच हिंदूंच्या प्रथा-परंपरा पाळून गणेशोत्सव आदर्श आणि प्रदूषणमुक्त साजरा करता येऊ शकतो, याचा संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श घालून द्यावा, अशी विनंती आहे.

वर्ष २०१६ मध्ये भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनीही प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या मूर्तींऐवजी शाडू मातीच्या गणेशमूर्ती वापरण्याचे आवाहन केले होते. नैसर्गिक रंगांचा वापर करून बनवलेल्या श्री गणेशमूर्ती या जलप्रदूषण रोखण्यासाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी योग्य असल्याचे त्यांनी सांगितले आहे, असेही त्या निवेदनात म्हटले आहे.

या प्रसंगी आयुक्तांसमवेत चर्चा करतांना अन्य हिंदुत्वनिष्ठांनी व्यक्त केलेले मत

• श्री. किशोर घाटगे, शिवसेना – प्रत्येक वर्षी हिंदुत्वनिष्ठ आणि तथाकथित पर्यावरणवादी यांच्यात या विषयावर वाद होतो. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शाडू मातीच्या मूर्तींचा पर्याय निवडल्यास धार्मिक दृष्टीने योग्य होईल आणि नदीचे प्रदूषण होणार नाही. तरी या दृष्टीने महापालिकेचा विचार व्हावा.

• श्री. संभाजीराव भोकरे, शिवसेना, उपजिल्हाप्रमुख, कोल्हापूर – प्रत्येक वर्षी गणेशोत्सवाच्या कालावधीत काही जण ‘प्रदूषण होते’, असा कांगावा करतात; मात्र वर्षभर कारखान्यांची मळी, तसेच अन्य कारणांमुळे होणारे प्रदुषण होतांना कुठे जातात ?