आडेली येथे कुजलेल्या स्थितीत विवाहितेचा मृतदेह सापडला

सौ. जानवी

वेंगुर्ले – तालुक्यातील जांभरमळा, आडेली येथे माहेरी आलेल्या एका विवाहितेचा मृतदेह येथील रहात्या घरी कुजलेल्या स्थितीत आढळला. अनुमाने १५ ते २० दिवसांपूर्वी हा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आडेली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी संजीवनी पाटील यांनी व्यक्त केला.

जांभरमळा येथील शांताराम धुरी यांची मुलगी सौ. जानवी (पूर्वाश्रमीचे नाव रेणुका) हिचा विवाह १५ जून २०२० या दिवशी कुडाळ तालुक्यातील नेरूर येथील जयवंत पाटकर यांच्याशी झाला; मात्र विवाहानंतर पती-पत्नींमध्ये मतभेद झाल्याने ४ मासांपूर्वी सौ. जानवी या माहेरी आल्या होत्या. त्यानंतर सौ. जानवी यांचे पती जयवंत यांनी घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज प्रविष्ट केला. सध्या सौ. जानवी आणि तिचे वडील, असे दोघेच आडेली येथे घरी रहात होते. तीन मासांपूर्वी वडील शांताराम धुरी हे मुंबईला मुलाकडे गेले होते. १२ फेब्रुवारीला दुपारी शेजार्‍यांनी त्यांना संपर्क करून घरातून कुजल्यासारखा वास येत असल्याचे कळवले. त्यानंतर सौ. जानवी यांचे वडील आणि भाऊ दोघेही मुंबई येथून घरी आल्यावर सौ. जानवी यांचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत असल्याचे आढळले. त्यानंतर शांताराम धुरी यांनी पोलीस ठाण्यात याची माहिती दिली.