शेअर्सच्या व्यवहारात ७०० हून अधिक जणांना ३० कोटी रुपयांचा गंडा घालणार्‍यावर गुन्हा नोंद !

अक्षय उत्तम भुजबळ

संभाजीनगर – ‘कमॉडिटी ट्रेडिंग आणि शेअर मार्केट’मध्ये पैसे गुंतवल्यास दुप्पट परतावा देतो, असे आमीष दाखवून राज्यातील ७०० हून अधिक लोकांची ३० कोटी रुपयांची फसवणूक करणारा तळेगाव (पुणे) येथील अक्षय उत्तम भुजबळ याच्यावर ९ फेब्रुवारी या दिवशी छावणी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद केला. एका वर्तमानपत्रात याचे वृत्त प्रकाशित झाल्यावर पोलीस आयुक्त गुप्ता यांनी भुजबळ याच्यावर तात्काळ गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले. या प्रकरणाचे अन्वेषण आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. फसवणूक झालेल्या लोकांचे प्रतिनिधी म्हणून येथील सुनील राठोड यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

मागील ४ मासांपासून या प्रकरणातील तक्रारदार पोलीस आयुक्तालयात चकरा मारत होते; पण पोलिसांनी तक्रार नोंद करून घेतली नव्हती. (असा आहे पोलिसांचा भोंगळ कारभार ! तक्रारदार तक्रार घेऊन आल्यानंतर लगेच तक्रार नोंद करून घेेणे, हे पोलिसांचे कर्तव्य असतांना पोलीस या गंभीर घटनेकडे दुर्लक्ष कसे करतात ? – संपादक) प्रियंका अक्षय भुजबळ, मंगल उत्तम भुजबळ, योगेश उत्तम भुजबळ हे ‘शेअर बाजारात पैसे गुंतवल्यास १० ते २० टक्के परतावा देतो’, असे सांगत. पहिल्या टप्प्यात ६६ लोकांनी फसवणूक झाल्याची तक्रार दिली. हा आकडा अनुमाने ३ कोटी रुपयांपर्यंत गेला आहे.

आम्हाला न्याय मिळवून द्या !  

‘पोलिसांनी गांभीर्याने अन्वेषण करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा’, अशी मागणी तक्रारदार विवेक पाटील यांनी केली. पुणे येथे फसवणुकीचे गुन्हे नोंद झाल्यानंतरही अक्षय भुजबळ याने संभाजीनगरसह मराठवाडा, खानदेश, विदर्भ येथील अनेकांची फसवणूक केली. त्यामुळे त्याला तात्काळ अटक करावी, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.

(अक्षय भुजबळ याच्यावर गुन्हा नोंद झाल्यावर पोलिसांनी लगेच त्याला अटक केली असती, तर इतर जिल्ह्यांतील लोकांची फसवणूक टळली असती. केवळ पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे अक्षय याने अनेक लोकांना गंडा घातला. त्यामुळे प्रथम दोषी पोलीस अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करायला हवी ! – संपादक)