असुरक्षित कराड !
सातारा, ११ फेब्रुवारी (वार्ता.) – कराड तालुक्यातील सुर्ली गावात एकजण गावठी बंदूक घेऊन फिरत होता. ही माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना मिळाली. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली धुमाळ यांच्या पथकाने संशयिताला कह्यात घेतले. त्या वेळी त्याच्याकडे १ गावठी बंदूक आणि ३ जिवंत काडतुसे असा ६५ सहस्र रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. त्याच्याकडे आणखी चौकशी केली असता त्याने बंदूक ठेवायला देणार्याचे नाव आणि पत्ता सांगितला. सांगली जिल्ह्यातील वांगी गावातील एका सराईत गुन्हेगाराने ही बंदूक ठेवण्यास दिल्याचे अन्वेषणात निष्पन्न झाले. पोलिसांनी सापळा रचून सराईत गुन्हेगाराला कह्यात घेतले. दोन्ही आरोपींविरुद्ध कराड तालुका पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियमाप्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.