परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी चंदनाच्या झाडाच्या पानांचा हार त्यांच्या छायाचित्राला घालता येऊन त्यांच्यासाठी तेल पाठवण्याची इच्छा पूर्ण होणे

साधकांचे तारणहार परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवापर्यंत त्यांच्यासाठी चंदनाचे तेल पाठवावे, अशी तीव्र इच्छा असणे; पण कारखान्यातील तेल काढण्याची प्रक्रिया बंद झाल्याने त्यांना तेल देता न येणे

सौ. राधा मंजुनाथ

मला पुष्कळ दिवसांपासून विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांना चंदनाचे तेल द्यावे आणि त्यांच्या जन्मोत्सवापर्यंत ते तेल त्यांना मिळावे, अशी माझी तीव्र इच्छा होती. चंदनाचे तेल श्रीविष्णूला प्रिय आहे आणि मैसुरूला चंदनाच्या तेलाचा कारखाना आहे. मी त्या कारखान्यात २ – ३ वेळा गेले. तेथील कामगारांनी मला १ मासाने यायला सांगितले. नंतर मी गुरुदेवांना प्रार्थना करून कारखान्यात गेले. तेव्हा तेल काढण्याची प्रक्रिया बंद झाली आहे, असे मला समजले. तेव्हा माझा भाव आणि तळमळ अल्प असल्यामुळे मी गुरुदेवांसाठी तेल पाठवू शकले नाही, असा विचार येऊन मला पुष्कळ वाईट वाटले अन् माझ्या मनात ती इच्छा तशीच राहिली.

२. बागेत चंदनाचे झाड दिसल्यावर गुरुदेवांना चंदनाचे तेल देऊ शकले नाही, तर त्यांच्या छायाचित्राला चंदनाच्या पानांचा हार घालूया, असा विचार करून झाडाची पाने तोडणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७८ व्या जन्मोत्सवाच्या आदल्या दिवशी मी एका बागेत गेले. तेथे मला चंदनाचे एक झाड दिसले. तेव्हा मी गुरुदेवांना चंदनाचे तेल देऊ शकले नाही; पण आपण त्यांच्या छायाचित्राला चंदनाच्या पानांचा हार करून घालूया, असा विचार माझ्या मनात आला. त्याच क्षणी मी झाडाची पाने तोडली. पाने तोडतांना मला पुष्कळ आनंद वाटत होता. तेथील एका व्यक्तीने मला विचारले, तुम्ही या पानांचे काय करणार ? मी तिला म्हणाले, ही पाने मी पूजेसाठी नेत आहे. (चंदनाची पाने काढण्याची तशी अनुमती नसते.)

३. परात्पर गुरुदेवांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्राला चंदनाच्या पानांचा हार घातल्याने पुष्कळ आनंद होणे आणि घरात चैतन्य जाणवणे

मी आनंदाने घरी आले आणि चंदनाच्या पानांचे ३ हार बनवले. दुसर्‍या दिवशी श्रीकृष्णाच्या प्रतिमेला आणि प.पू. भक्तराज महाराज अन् प.पू. डॉक्टर यांच्या छायाचित्रांना ते हार घातले. त्या दिवशी घरात पुष्कळ चैतन्य जाणवत होते. विशेष म्हणजे माझ्या यजमानांनी गुरुदेवांच्या जन्मोत्सवानिमित्त तोरण करण्यासाठी आंब्याचे डहाळे आणले होते. त्यामुळे देवघरात चैतन्य जाणवत होते. माझे यजमान, मुले आणि नात यांना पूजेची ही आरास पुष्कळ आवडली. परात्पर गुरु डॉक्टरांच्या चैतन्यामुळे सर्वांचे तोंडवळे आनंदी दिसत होते.

परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्राला चंदनाच्या पानांचा हार घातल्यामुळे मला अत्यंत आनंद झाला होता. मी परात्पर गुरु डॉक्टरांना चंदनाचे तेल देऊ शकले नव्हते; म्हणून गुरुदेवांनी माझ्याकडून चंदनाच्या पानांचा हार करून घेतला, असे वाटून माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त होत होती. गुरुदेव साधकांची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात, याची मी अनुभूती घेतली. त्यासाठी गुरुदेवा, पुन्हा एकदा कोटीश: कृतज्ञता !

४. श्रीविष्णुरूप परात्पर गुरुदेवांना केलेली भावपूर्ण प्रार्थना

हे कमलनयन श्रीविष्णुरूप परात्पर गुरुदेवा, या राधेने या दोन डोळ्यांनी तुमचे हे सुंदर रूप कितीही पाहिले, तरी ते अल्पच आहेे. या वाणीने तुमचे कितीही गुणगान केले, तरी अल्पच आहे. या कानांनी तुमचे वर्णन कितीही वेळा ऐकले, तरी ते अल्पच आहे. गुरुराया, अशा या राधेला आता तुमच्या चरणाशी घ्या, अशी प्रार्थना करते.

– सौ. राधा मंजुनाथ, मैसुरू (२२.५.२०२०)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक