मुंबई – पुणे येथे झालेल्या ‘एल्गार परिषदे’त हिंदुद्वेषी शरजील उस्मानी याने हिंदु धर्म आणि समाज यांवर टीका केल्यानंतर त्याला पुणे येथेच चोपायला हवे होते; पण मला प्रश्न पडतो की, त्याला कुणी हे बोलायला लावले आहे का ? कारण सध्या राज्यात अशाच पद्धतीचे राजकारण चालू आहे. कुणाला तरी बोलायला लावायचे आणि त्यावर मग राजकारण करायचे, अशा शब्दांत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ६ फेब्रुवारी या दिवशी पत्रकार परिषदेत संताप व्यक्त केला.
औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ नामांतर करण्याविषयी ते पुढे म्हणाले की, भाजप असो किंवा शिवसेना असो, ज्या वेळी केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे त्या २ पक्षांची सत्ता होती, तेव्हा नामांतरण का झाले नाही ? आज कसले राजकारण तुम्ही करत आहात ? इतर अनेक शहरांची नावे पालटली गेली. देहली येथे तर रस्त्यांची नावे पालटली आहेत. मग केंद्रात आणि राज्यात तुमचे सरकार असतांना त्या वेळी औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ का झाले नाही ? याचे उत्तर भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी द्यायला हवे. लोकांना काय वेडे समजलात का ? निवडणुकांच्या तोंडावर संभाजीनगरचा विषय आणायचा. इतकी वर्षे तुम्हाला थांबवणारे कुणीच नव्हते. केंद्र आणि राज्य येथे हे दोन्ही पक्ष असतांना तेव्हा हे विषय येत नाहीत. मग निवडणुका लागल्या की, आताच कुठून येतात ? मला असे वाटते की, संभाजीनगरची जनता हुशार आहे. ते त्यांचा योग्य निर्णय आणि या लोकांचा योग्य समाचारही घेतील.