सिंधुदुर्ग – जिल्ह्यात ५ फेब्रुवारीला शिवसेनेच्या वतीने इंधन दरवाढीच्या विरोधात, तर भाजप वीजदरवाढ आणि वीजदेयके थकित असलेल्या ग्राहकांची वीजजोडणी तोडण्याच्या घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात आंदोलन करणार आहेत.
इंधन दरवाढीच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन
केंद्र सरकारने अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेल इंधन यांची दरवाढ केल्याच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर ५ फेब्रुवारीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे.
वीजदरवाढीच्या विरोधात भाजपचे आंदोलन
राज्य सरकार आणि ऊर्जामंत्री यांनी वीज दरवाढ करत जनतेच्या माथी बोजा टाकला आहे. ‘थकीत वीजदेयक असलेल्या वीजग्राहकांची विजेची जोडणी तोडणार नाही’, असे सांगणार्या ऊर्जामंत्र्यांनी आता वीजजोडणी तोडण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेचा निषेध म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्या वतीने तालुकानिहाय आंदोलन करण्यात येणार आहे.
तालुक्यातील वीज कार्यालयासमोर ५ फेब्रुवारीला सकाळी हे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी दिली.