स्वातंत्र्यविरांचा त्याग आणि बलीदान यांच्या स्मृती

२६ जानेवारी या दिवशी देशाने प्रजासत्ताकदिन साजरा केला. या हेतूने स्वातंत्र्यविरांचा त्याग आणि बलीदान यांच्या स्मृती जागृत करण्याचा या लेखाच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे.

स्वातंत्र्यविर

उत्तर दिशेला हिमालय, पूर्वेकडे बंगालचा उपसागर, पश्‍चिमकडे अरबी समुद्र आणि दक्षिणकडे हिंदी महासागर, अशा चारही दिशांनी हिंदुस्थान वेढलेला आहे. यामुळे हिंदुस्थानला परकीय आक्रमकांपासून संरक्षण लाभले. असे असूनही निरनिराळ्या देशांतून सीमा ओलांडून भारतात परकीय आक्रमक येतच राहिले. या भूमीचे लोकांना आकर्षण होते. ख्रिस्तपूर्व ३०० ते ६०० हा हिंदुस्थानच्या वैभवाचा कालखंड होता. आशिया खंडात हिंदूंइतके पराक्रमी कुणी नव्हते. येथील शेतकरी आणि कारागीर मेहनती होते. राजा अशोकच्या काळात हिंदुस्थानच्या सीमा अफगाणिस्तान, बलुचिस्तान, सिंध, नेपाळ इथपर्यंत पोचल्या होत्या.

सातव्या-आठव्या शतकांपासून मुसलमान देशात आले. तलवारीच्या जोरावर धर्मप्रसार करण्याची आक्रमक भूमिका त्यांनी घेतली. इस्लामी आक्रमणासमवेतच क्रौर्य, जुलूम, पाशवी अत्याचार, बलात्कार, विश्‍वासघात, फितुरी अशा प्रकारे सर्वत्र कलहाचे वातावरण झाले. १७ व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सुलतानशाहीपुढे कडवे आव्हान उभे केले. पेशव्यांनी मोगलाईच्या ५० ते ६० वर्षांत उत्तरेपर्यंत झेंडे रोवले. अनेक वर्षांच्या कलहामुळे हिंदू आणि मुसलमान अशी धार्मिक तेढ निर्माण झाली. याला इंग्रजांनी खतपाणी घातले आणि देशाला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागले. इंग्रजांनी इंग्रजी विद्या आणि ख्रिस्ती धर्म यांचा प्रसार केला. देशात मिशनरी आणले.

वर्ष १८५७ चा उठावाचा दृश्य परिणाम

भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा प्रारंभ वर्ष १८५७ मध्ये झाला. या लढ्यात अनेकांनी प्राणार्पण केले. या काळात लहान-मोठे उठाव झाले. या काळात संपूर्ण देशातून एकाच वेळी उठाव झाला असता, तर पहिल्या स्वातंत्र्यसमरातच इंग्रजांचा पाडाव झाला असता आणि भारत स्वतंत्र झाला असता. पहिले हुतात्मा मंगल पांडे यांनी इंग्रजांच्या विरोधात पुकारलेले बंड हे असंख्य तरुणांसाठी स्फूर्तीदायक ठरले. स्वत:च्या मुलाला पाठीशी बांधून घोड्यावर स्वार होऊन स्वातंत्र्य आणि स्वाभिमान रक्षणासाठी रणांगणात उतरून हौतात्म्य पत्करणारी झाशीची राणी लक्ष्मीबाई जगाच्या इतिहासात सर्वांनाच दीपवून गेली. वर्ष १८५७ मध्ये उठावाचा सर्वांत मोठा दृश्य परिणाम म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीला देशातून गाशा गुंडाळावा लागला.

स्वराज्य मिळवण्यात वृत्तपत्रांचे योगदान

‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’, असे सांगणारे लोकमान्य टिळक यांनी ‘केसरी’ अन् ‘मराठा’ अशा दोन्ही वृत्तपत्रांतून इंग्रजांच्या विरोधात जागृती केली. ही दोन्ही वृत्तपत्रे म्हणजे इंग्रजी सत्तेवर मुलुखमैदानी तोफच होती. या काळात बंगालमध्ये अनेक वृत्तपत्रे प्रकाशित होऊ लागली. ‘वन्दे मातरम्’, ‘संध्या’, ‘अमृत बझार पत्रिका’, ‘यंग इंडिया’, तसेच पंजाबी, हिंदी, उर्दू, मराठी, गुजराती आदी वृत्तपत्रांनी स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात स्वत:चा ठसा उमटवला. वर्ष १९०८ मध्ये नवीन कायदा आणून वृत्तपत्रांवर बंदी घालण्यात आली.

स्वातंत्र्यवीर म्हणजे भारतीय संपत्तीचे खरे भांडार !

या काळात अनेक समाजसुधारकांनी समाज सुधारण्याच्या चळवळी उभारून नवीन इतिहास घडवला. वर्ष १९१९ मध्ये जालियनवाला बाग हत्याकांड झाले. यामध्ये सरदार भगतसिंग यांचा भाऊ जगतसिंह गोळीबारात मारला गेल्याची बातमी देशभरात पसरल्यानंतर देशात संताप पसरला. या वेळी तरुणाई स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ‘जगायचे ते देशासाठी आणि मरायचे ते देशासाठी’, हे म्हणणे प्रत्यक्ष कार्यवाहीत आणत होती. अखेर १४ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री भारत देश स्वतंत्र झाल्याची ऐतिहासिक घोषणा झाली. स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यविरांचा त्याग आणि बलीदान यांच्या स्मृती, हेच खरे भारतीय संपत्तीचे भांडार होय !

– श्री. चंद्रकांत उपाख्य भाई पंडित, म्हापसा, गोवा.