सत्तरी इतिहास संवर्धन समितीच्या चलो नाणूस किल्ला कार्यक्रमात मच्छिंद्र च्यारी यांची मागणी
वाळपई, २८ जानेवारी (वार्ता.) – क्रांतीवीर दीपाजी राणे यांनी पोर्तुगिजांच्या विरोधात नाणूस किल्ल्यावर क्रांती केली होती. या पहिल्या सशस्त्र क्रांतीला संपूर्ण भारतात प्रचंड महत्त्व आहे. त्यामुळे या क्रांतीला राष्ट्रीय मान्यता द्यायला हवी, अशी मागणी मराठी राजभाषेचे कार्यकर्ते मच्छिंद्र च्यारी यांनी केली. सत्तरी इतिहास संवर्धन समितीने चलो नाणूस किल्ला या कार्यक्रमांतर्गत नाणूस किल्ल्यावर आयोजित केलेल्या क्रांतीदिन कार्यक्रमात प्रमुख वक्ते या नात्याने मच्छिंद्र च्यारी बोलत होते. या वेळी विशेष निमंत्रित या नात्याने अधिवक्ता सर्वज्ञ पाटील, सत्तरी इतिहास संवर्धन समितीचे समन्वयक अधिवक्ता शिवाजी देसाई, क्रांतीवीर दीपाजी राणे यांचे पणतू दीपाजी राणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी अधिवक्ता शिवाजी देसाई म्हणाले, सरकारने येत्या काळात नाणूस किल्ल्याचे संवर्धन न केल्यास सत्तरीची माती सरकारला क्षमा करणार नाही. या विषयावर शासनाला अनेक निवेदने देण्यात आली आहेत. कार्यक्रमाच्या प्रारंभी नाणूस किल्ल्याला मानवंदना देऊन दिवंगत स्वातंत्र्यसैनिक आणि हुतात्मा सैनिक यांना श्रद्धांजली वहाण्यात आली.
नाणूस येथील दीपाजी राणे किल्ला, तेरेखोल येथील हिरवे गुरुजी स्मारक आदी राज्यातील ऐतिहासिक स्मारकांचे सुशोभिकरण करणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्रीपणजी, २८ जानेवारी (वार्ता.) – नाणूस, सत्तरी येथील दीपाजी राणे किल्ला; तेरेखोल, पेडणे येथील हिरवे गुरुजी स्मारक आदी ऐतिहासिक स्मारकांचे शासन सुशोभिकरण करणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा विधानसभेत दिली. फोंडा येथील क्रांती मैदानाविषयी आमदार रवि नाईक यांनी उपस्थित केलेल्या एका तारांकित प्रश्नाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उत्तर देत होते. |