पणजी, २७ जानेवारी (वार्ता.) – कोरोना महामारीवर नियंत्रण आणणारी कोरोना लस उपलब्ध केल्याविषयी गोवा विधानसभेने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कोरोना लस निर्माण करणार्या सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक इंटरनॅशनल ही आस्थापने यांचे अभिनंदन करणारा ठराव आरोप-प्रत्यारोपानंतर संमत केला. भाजपचे आमदार सुभाष शिरोडकर आणि अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी हा ठराव मांडला होता.
या ठरावावर चर्चा करतांना गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई आणि सत्ताधारी पक्षातील आमदार यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. चर्चेत आमदार विजय सरदेसाई म्हणाले, कोरोना लसीविषयी खोटा विश्वास निर्माण करण्यासाठी विधानसभेत ठराव मांडण्यात आला आहे. कोरोना महामारीच्या काळात रुग्णालयांमध्ये काही ठिकाणी प्राणवायूचा (ऑक्सीजन) तुटवडा निर्माण झाल्याचा आरोप आमदार विजय सरदेसाई आणि आमदार रोहन खंवटे यांनी केला; मात्र आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी हा आरोप बिनबुडाचा असल्याचे म्हटले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ठरावावर चर्चा करतांना कोरोना महामारी चांगल्या रितीने हाताळल्याने संपूर्ण जग भारताकडे कौतुकाने पहात असल्याचे सांगितले.
(म्हणे) लोकांमध्ये विश्वास निर्माण होण्यासाठी कोरोनाची लस प्रथम आमदारांना द्या ! – विरोधी सदस्यांची मागणी
कोरोनाची लस आरोग्य कर्मचार्यांना देण्यात आली असून त्यावरून समाजात लस सुरक्षित असल्याचा विश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे विरोधकांची मागणी जनहिताच्या नावाखाली स्वतःचा स्वार्थ साधणारी का समजू नये ?
पणजी – कोरोनाच्या लसीविषयी लोकांमध्ये विश्वास निर्माण व्हावा, यासाठी कोरोनाची लस प्रथम राज्यातील सर्व ४० आमदारांना द्यावी, अशी मागणी गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई आणि अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी केला; मात्र मंत्री मावीन गुदिन्हो यांनी ही मागणी फेटाळतांना कोरोनाची लस प्रथम गरजूंना आणि नंतर आमदारांना देण्यात येणार असल्याचे म्हटले.