भुरट्या चोरांना मार्गावर आणण्यासाठी मुंबई पोलिसांची आरोपी दत्तक योजना !

  • अशी वरवरची उपाययोजना राबवून समाजातील गुन्हेगारी कधीतरी रोखली जाईल का ? त्यापेक्षा आरोपींची गुन्हेगारी वृत्ती पालटण्यासाठी त्यांना साधना शिकवणे अनिवार्य आहे, हे लक्षात घेतले पाहिजे !
  • गुन्हेगारी रोखण्यात पोलीस अपयशी ठरत असल्याने त्यांना अशा योजना राबवाव्या लागत आहेत. त्यामुळे या योजनेच्या अंतर्गत आरोपींना देण्यात येणारी रक्कम पोलिसांच्या खिशातून द्यायला हवी !
  • यातही पोलिसांनी भ्रष्टाचार केला नाही म्हणजे मिळवले, असे कुणाला वाटल्यास आश्‍चर्य वाटायला नको !

मुंबई – चोरी, दरोडा, घरफोडी, मारामारी, सोनसाखळी चोरी यांसारखे गुन्हे रोखण्यासाठी आणि गुन्हेगारीवर नियंत्रण रहावे, यासाठी मुंबई पोलिसांकडून गेल्या नोव्हेंबर मासापासून आरोपी दत्तक योजना राबवली जात आहे. यात एक पोलीस एका गुन्हेगाराच्या सर्व वैयक्तिक माहितीची नोंद ठेवतो. यामध्ये गुन्हेगाराची उपजीविका, त्याची जीवनशैली, दिनक्रम, कुटुंबातील सदस्य, दिवसभरात तो कुठे कुठे जातो ?, कुणाला भेटतो ?, आदी माहितीची यात नोंद असते. १५ दिवसांनी यासंदर्भातील अहवाल दिला जातो.

गुन्हे वाढू नयेत, यासाठी गुन्हेगारांकडून चांगल्या वागणुकीचे हमीपत्र भरून घेतले जात आहे. हे हमीपत्र २५ सहस्र रुपयांपासून ते तब्बल ५० लाख रुपयांपर्यंतचे आहे. यामुळे गुन्हेगारांची वर्तणूक चांगली राहील, अशी पोलिसांना आशा आहे. पोलिसांनी गेल्या २ मासांत १४ सहस्र ८५८ गुन्हेगार  दत्तक घेतले आहेत.