ईशनिंदाविरोधी कायदा बनवून श्रद्धास्थानांचा होणारा अवमान रोखण्यासाठी कठोर कायदा करा !

गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासन आणि पोलीस यांना निवेदन सादर

तहसीलदार जीवन क्षीरसागर (उजवीकडे) यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते

गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर), २३ जानेवारी (वार्ता.) – आज नाटके, चित्रपट, वेब सिरीज, विज्ञापने, काव्ये, चित्रे आदींद्वारे धर्म, धर्मग्रंथ, देवता, संत आणि राष्ट्रपुरुष यांचे मोठ्या प्रमाणात विडंबन केले जात आहे. सध्या ‘ॲमेझॉन प्राईम’वर ‘तांडव’ ही वेब सिरीज नुकतीच प्रसारित झाली आहे. या वेब सिरीजमध्ये कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत भगवान शिव आणि भगवान श्रीराम यांच्याविषयी आक्षेपार्ह संवाद दाखवून त्यांचा अवमान करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर भारतात देवतांची विटंबना करणार्‍यांवर वचक बसावा आणि सामाजिक शांतता, धार्मिक सलोखा, कायदा-सुव्यवस्था अबाधित राखावी यासाठी कठोर कायद्याची आवश्यकता भासत आहे. तरी या संदर्भात दोषींवर कठोर कारवाई करणारा ‘ईशनिंदाविरोधी कायदा’ करावा, या मागणीचे केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शहा आणि केंद्रीय कायदामंत्री श्री. रवीशंकर प्रसाद यांच्या नावे असलेले निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २३ जानेवारी या दिवशी उपजिल्हाधिकारी कार्यालय येथे निवासी तहसीलदार जीवन क्षीरसागर यांना, तसेच उपविभागीय पोलीस कार्यालयात निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. वामन बिलावर आणि श्री. वासू बिलावर उपस्थित होते.