प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा !

हिंदु जनजागृती समितीची पणजी, फोंडा, डिचोली आणि म्हापसा येथील शासकीय अधिकार्‍यांकडे मागणी

प्रत्येक वर्षी अशी मागणी प्रशासनाकडे का करावी लागते ?

डिचोली येथील उपजिल्हाधिकारी श्री. दीपक वायंगणकर (डावीकडून दुसरे) यांना निवेदन देतांना श्री. गोविंद चोडणकर. समवेत नगरसेवक श्री. विजयकुमार नाटेकर (सर्वांत डावीकडे), श्री. बाबाजी कानोळकर आणि श्री. दिलीप माणगावकर (सर्वांत उजवीकडे)

पणजी, २१ जानेवारी – प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने पणजी, फोंडा, डिचोली आणि म्हापसा येथील शासकीय अधिकार्‍यांची भेट घेऊन त्यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, २६ जानेवारी या दिवशी अनेक जण राष्ट्रध्वज विकत घेऊन तो मोठ्या अभिमानाने मिरवतात; मात्र हेच कागदी किंवा प्लास्टिकचे छोटे छोटे राष्ट्रध्वज त्याच दिवशी रस्त्यावर, कचर्‍यात, गटारात आदी ठिकाणी पडलेले आढळतात. त्यामुळे अनेक दिवस या राष्ट्र्र्र्रध्वजांची विटंबना होते. राष्ट्रध्वजाद्वारे होणारा अवमान रोखण्यासाठी शासनाने विविध माध्यमांतून जनजागृती करावी. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री रोखावी. जिल्ह्यात कुठेही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचे उत्पादन आणि त्याची विक्री होत असल्यास संबंधित उत्पादकांवर त्वरित कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.

फोंडा येथे उपजिल्हाधिकारी श्री. केदार नाईक यांना निवेदन दिल्यानंतर डावीकडून सौ. श्रावणी बेहरे, श्री. श्रीराम खेडेकर आणि श्री. उमेश गावणेकर

‘तिरंगा मास्क’ची विक्री करणार्‍यांवरही कारवाईची मागणी

यंदा दुकानातून, तसेच ‘ऑनलाईन’ पद्धतीने तिरंग्याच्या रंगातील ‘मास्क’ची विक्री होत असल्याचे आढळून आले आहे. तिरंग्याचा मास्क वापरल्याने राष्ट्रध्वजाचे पावित्र्य राखले जात नाही. ‘तिरंगा मास्क’ हे देशप्रेम प्रदर्शनाचे माध्यम नाही, तर ध्वजसंहितेनुसार ‘राष्ट्रध्वजाचा अशा प्रकारे उपयोग करणे’, हा ध्वजाचा अवमानच आहे, तसेच ‘राष्ट्र गौरव अपमान निवारण अधिनियम १९७१’चे उल्लंघन आहे. त्यामुळे ‘तिरंगा मास्क’ची विक्री, तसेच वापर करणार्‍यांना शासन करावे, अशी मागणी समितीने केली आहे.

पणजी – येथे उत्तर गोव्याचे उपजिल्हाधिकारी श्री. गोपाळ पार्सेकर यांना निवेदन दिले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळामध्ये सौ. शुभा सावंत, सौ. प्रतिभा हळदणकर, सर्वश्री भारत हेगडे, केशव चोडणकर आणि प्रदीप जोशी यांचा समावेश होता.

फोंडा – येथील उपजिल्हाधिकारी श्री. केदार नाईक यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळामध्ये सौ. श्रावणी बेहरे, सर्वश्री सत्यविजय नाईक, उमेश गावणेकर आणि श्रीराम खेडेकर यांचा समावेश होता.

डिचोली – येथील उपजिल्हाधिकारी श्री. दीपक वायंगणकर यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळामध्ये डिचोली पालिकेचे नगरसेवक सर्वश्री विजयकुमार नाटेकर, तसेच गोविंद चोडणकर, बाबाजी कानोळकर आणि दिलीप माणगावकर यांचा समावेश होता.

म्हापसा – येथील उपजिल्हाधिकारी श्री. कपिल फडते यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळामध्ये श्री. लक्ष्मण मांद्रेकर, श्रीमती शशिकला भगत आणि सौ. नयना हळर्णकर यांचा समावेश होता.