नाविन्यपूर्ण अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय
वराड, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग येथील प.पू. परुळेकर महाराज यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासाठी दिलेल्या प्रसादस्वरूप नारळातून पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित होणे
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
‘प.पू. दास महाराज (प.पू. रघुवीर महाराज) प.पू. परुळेकर महाराज यांना भेटायला त्यांच्या निवासस्थानी गेले होते. तेव्हा त्यांनी प.पू. दास महाराज यांना एक नारळ दिला आणि सांगितले, ‘‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी या नारळातील पाणी ग्रहण करावे.’’ प.पू. परुळेकर महाराज यांनी दिलेल्या प्रसादस्वरूप नारळामध्ये पुष्कळ चैतन्य असल्याचे जाणवले. प.पू. परुळेकर महाराज यांनी दिलेल्या प्रसादस्वरूप नारळाची आध्यात्मिक वैशिष्ट्ये विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.
१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन
या चाचणीत प.पू. परुळेकर महाराज यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासाठी प्रसाद म्हणून दिलेला नारळ आणि तुलनेसाठी ‘सनातन-आश्रमातील नारळ’ (हा आश्रमातील नारळांच्या साठ्यातील नारळ आहे.) आणि ‘पेठेतील (बाजारातील) सर्वसाधारण नारळ’ (हा स्थानिक बाजारातून आणलेला नारळ आहे.) यांची निरीक्षणे करण्यात आली. हे तिन्ही नारळ फोडल्यानंतर त्यातील थोडे पाणी आणि खोबर्याचे तुकडे यांचीही निरीक्षणे करण्यात आली. ती पुढे दिली आहेत.
वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’
जागेअभावी या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.
१ अ. नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विश्लेषण – प.पू. परुळेकर महाराज यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासाठी दिलेल्या प्रसादस्वरूप नारळामध्ये पुष्कळ चैतन्य (सकारात्मक स्पंदने) असणे :
हे पुढे दिलेल्या सारणीतून लक्षात येते.
वरील सारणीतून पुढील सूत्रे लक्षात येतात.
१ अ १. सर्वसाधारण नारळामध्ये पुष्कळ नकारात्मक स्पंदने असणे : नारळ फोडण्यापूर्वी त्यामध्ये पुष्कळ नकारात्मक ऊर्जा असून थोड्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा होती. नारळ फोडल्यानंतर त्यातील पाणी आणि खोबरे यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा मुळीच नसून पुष्कळ नकारात्मक ऊर्जा आढळली.
१ अ २. सनातन-आश्रमातील नारळामध्ये सकारात्मक स्पंदने असणे : नारळ फोडण्यापूर्वी त्यामध्ये नकारात्मक ऊर्जा मुळीच नसून सकारात्मक ऊर्जा होती. नारळ फोडल्यानंतर त्यातील पाणी आणि खोबरे यांच्यामध्येही नकारात्मक ऊर्जा मुळीच नसून सकारात्मक ऊर्जा आढळली.
१ अ ३. प.पू. परुळेकर महाराज यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासाठी प्रसादस्वरूप दिलेल्या नारळामध्ये पुष्कळ चैतन्य असणे : नारळ फोडण्यापूर्वी त्यामध्ये नकारात्मक ऊर्जा मुळीच नसून पुष्कळ सकारात्मक ऊर्जा होती. नारळ फोडल्यानंतर त्यातील पाणी आणि खोबरे यांच्यामध्येही नकारात्मक ऊर्जा मुळीच नसून पुष्कळ सकारात्मक ऊर्जा आढळली. चाचणीतील अन्य दोन्ही नारळांच्या तुलनेत या नारळातील सकारात्मक ऊर्जेचे प्रमाण अनुमाने ६९ मीटरहून अधिक आहे. हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. असाच भाग या नारळातील पाणी आणि खोबरे यांच्या संदर्भातही आहे.
२. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
२ अ. सर्वसाधारण नारळामध्ये नकारात्मक स्पंदने असण्याचे कारण : नारळ मुळात सात्त्विक फळ असल्याने त्यामध्ये सकारात्मक स्पंदने असतात. सध्याचे वातावरण अत्यधिक रज-तमयुक्त असल्याने त्याचा परिणाम अन्नपदार्थ, वनस्पती, प्राणी-पक्षी आणि मानव इत्यादींवर होतो. चाचणीतील सर्वसाधारण नारळावर त्रासदायक स्पंदनांचे आवरण असल्याने त्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली. हा नारळ ज्या ठिकाणाहून (स्थानिक बाजारातून) आणला होता, तेथील त्रासदायक वातावरणामुळे तो नकारात्मक स्पंदनांनी भारित झाला होता. यामुळे नारळ फोडल्यावर त्यातील पाणी आणि खोबरे यांच्यामध्ये सकारात्मक स्पंदने मुळीच नसून नकारात्मक स्पंदने आढळली. नकारात्मक स्पंदनांनी भारित वस्तूचा उपयोग केल्याने त्यातील त्रासदायक स्पंदनांमुळे व्यक्तीला त्रास होऊ शकतो. यासाठी बाहेरून (पेठेतून) आणलेल्या वस्तूंची (उदा. फळे, भाज्या किंवा तत्सम वस्तू यांची) शुद्धी करून त्यांचा उपयोग करणे श्रेयस्कर आहे.
२ आ. सनातन-आश्रमातील नारळामध्ये सकारात्मक स्पंदने असण्याचे कारण : चाचणीत तुलनेसाठी घेतलेल्या आश्रमातील साठ्यातील नारळामध्ये नकारात्मक स्पंदने मुळीच नसून सकारात्मक स्पंदने होती. नारळ फोडल्यानंतर त्यातील पाणी आणि खोबरे यांमध्येही सकारात्मक ऊर्जा आढळली. याचे कारण हे की, आश्रमात बाहेरून आणलेल्या सर्व साहित्याची, उदा. फळे, भाज्या, धान्य इत्यादींवर विभूती फुंकरून प्रथम त्यांची शुद्धी केली जाते. यामुळे त्यांच्यावर त्रासदायक स्पंदनांचे आवरण आलेले असल्यास ते नष्ट होते. तसेच आश्रमातील सात्त्विकतेचा त्यांच्यावर सकारात्मक परिणाम होऊन ती चैतन्याने (सकारात्मक स्पंदनांनी) भारित होतात. त्यानंतर त्यांचा उपयोग केला जातो.
२ इ. प.पू. परुळेकर महाराज यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासाठी प्रसादस्वरूप दिलेल्या नारळामध्ये पुष्कळ चैतन्य असणे : जेव्हा एक संत दुसर्या संतांना काही विशिष्ट उद्देशाने एखादी वस्तू प्रसादस्वरूप देतात, तेव्हा ती वस्तू संतांच्या संकल्प-शक्तीने भारित होते. त्यामुळे त्या वस्तूमध्ये पुष्कळ चैतन्य निर्माण होते. दुसर्या संतांनी ती प्रसादस्वरूप वस्तू (उदा. या प्रसंगात नारळातील पाणी) ग्रहण केल्याने त्यांना त्यातील चैतन्याचा लाभ होतो. याचाच प्रत्यय प.पू. परुळेकर महाराज यांनी परात्पर गुरु डॉक्टरांना दिलेल्या प्रसादस्वरूप नारळाच्या संदर्भात आला. हा नारळ फोडण्यापूर्वी त्यामध्ये पुष्कळ अधिक (७१.७१ मीटर) सकारात्मक ऊर्जा होती. नारळ फोडल्यानंतर त्यातील पाणी आणि खोबरे यांच्यामध्ये त्याहीपेक्षा अधिक (अनुक्रमे ९१.७८ मीटर आणि ९०.४५ मीटर) सकारात्मक ऊर्जा आढळली. प.पू. परुळेकर महाराज यांचा आध्यात्मिक अधिकार मोठा आहे. त्यांनी ‘परात्पर गुरु डॉक्टरांचे आरोग्य चांगले रहावे’, यासाठी नारळामध्ये चैतन्य संक्रमित करून त्या नारळातील पाणी ग्रहण करण्यास सांगितले. परात्पर गुरु डॉक्टर कृतज्ञाभावात राहून संतांनी सांगितलेले उपाय अतिशय भावपूर्ण करतात. ‘संतांची संकल्पशक्ती कशी कार्य करते ?’, हे सर्वांना कळावे, म्हणून परात्पर गुरु डॉक्टर महर्षि आणि काही संत यांनी सांगिलेल्या आध्यात्मिक उपायांच्या संदर्भात वैज्ञानिक उपकरणाद्वारे संशोधन करतात. त्यामुळे सामान्यजन, जिज्ञासू, साधक आणि भक्त यांना महर्षि अन् संत यांचे आध्यात्मिक सामर्थ्य लक्षात येऊन त्यांची श्रद्धा वृद्धींगत होते. यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि विविध आध्यात्मिक उपाय सांगणारे महर्षि अन् संत यांच्या चरणी कोटीश: कृतज्ञता !’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१२.१.२०२१)
ई-मेल : [email protected]
प.पू. परुळेकर महाराज यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासाठी दिलेल्या प्रसादस्वरूप नारळाची ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे चाचणी करतांना साधकाला आलेली अनुभूती‘प.पू. परुळेकर महाराज यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासाठी दिलेल्या प्रसादस्वरूप नारळाची ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे चाचणी करण्यासाठी मी तो नारळ हातात घेतला, तेव्हा माझी पुष्कळ भावजागृती झाली. नारळ फोडल्यानंतर त्यातील पाणी आणि खोबरे यांची चाचणी करतांना पुष्कळ ऊन होते; पण प्रत्यक्ष चाचणी करत असतांना माझ्यावर सावली असल्यासारखे मला जाणवले. चाचणीसाठी माझ्या समवेत असलेल्या साधकाने नंतर मला सांगितले, ‘चाचणी करतांना तुमच्या डोक्यावर सावली दिसत होती; पण तुमच्या मागे मात्र ऊन दिसत होते.’ हे ऐकल्यावर ‘सूर्यदेवाने मला गुरुसेवा करता यावी, यासाठी सावली प्रदान केली’, असे जाणवले. या नारळातील पाणी आणि खोबरे यांच्याकडे पाहून पुष्कळ चैतन्य जाणवत होते.’ – एक साधक (७.१.२०२१) |
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |